X
X

भारताच्या हद्दीत घुसखोरी केलेल्या हेलिकॉप्टरमध्ये होते पाकव्याप्त काश्मीरचे पंतप्रधान

READ IN APP

नियंत्रण रेषेजवळ रविवारी दुपारी हवाई हद्दीच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या एका पाकिस्तानी हेलिकॉप्टरवर भारतीय सैन्याकडून तात्काळ कारवाई करण्यात आली होती.

जम्मू-काश्मीरच्या पूँछ सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ रविवारी दुपारी हवाई हद्दीचे उल्लंघन करणाऱ्या एका पाकिस्तानी हेलिकॉप्टरवर भारतीय सैन्याकडून तात्काळ कारवाई करण्यात आली होती. परवानगीशिवाय भारतीय हद्दीत घुसलेल्या या हेलिकॉप्टरवर गोळीबार करण्यात आला होता.

भारतीय सैन्याने गोळीबार केलेल्या या हेलिकॉप्टरमध्ये पाकिस्तान व्याप्त काश्मीरचे पंतप्रधान राजा फारुख हैदर खान, पीओकेचे पर्यटन मंत्री मुश्ताक मिन्हास, शिक्षण मंत्री इफ्तिकार गिलानी अशी बडी नेते मंडळी असल्याची माहिती समोर आली आहे. पीओकेचे पर्यटन मंत्री मुश्ताक मिन्हास यांनी स्वत: इंडियन एक्सप्रेसशी बोलताना ही माहिती दिली.

आमच्याकडून हवाई हद्दीचे उल्लंघन झाले आहे किंवा आमच्या हेलिकॉप्टरवर गोळीबार झाला आहे याबद्दल आम्हाला काही कल्पना नव्हती. आमचे हेलिकॉप्टर निश्चित स्थळी उतरल्यानंतर आमच्या हेलिकॉप्टरवर भारतीय सैन्याने गोळीबार केल्याचे आम्हाला समजले असे मिन्हास यांनी सांगितले.

पूँछ शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर सरला बटालियन सेक्टरमध्ये करमारा भागात दुपारी सव्वाबाराच्या सुमारास हे हेलिकॉप्टर उड्डाण करत असल्याचे सुरक्षा दलांच्या निदर्शनास आले. भारत-पाकिस्तानमधल्या करारानुसार कुठलेही हेलिकॉप्टर नियंत्रण रेषेच्या एक किमी कक्षेत येऊ शकत नाही. गोळीबार करताना लष्कराने छोटया शस्त्रांचा वापर केला. यामध्ये कुठेही हेलिकॉप्टरचे नुकसान झाले नाही.

आम्ही हेलिकॉप्टरमध्ये असताना वैमानिकाला एटीसीकडून कुठलाही संदेश मिळाला नाही. आमचे खासगी हेलिकॉप्टर असल्यामुळे कदाचित एटीसीकडून संदेश आला नसावा. आदल्यारात्रीच आम्ही अचानक हा दौरा आखला होता. सामाहनी येथे एका शोकसभेसाठी आम्ही चाललो होते. रस्ते मार्गाने हा प्रवास सात तासांचा होता. त्यासाठी आम्ही हेलिकॉप्टरने जाण्याचा पर्याय निवडला असे मिन्हास यांनी सांगितले.

21
X