पीटीआय, नवी दिल्ली : मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यांनी रविवारी उत्तर भारतातील अनेक राज्यांना जोरदार तडाखा दिला. पर्वतीय राज्यांमधील विविध घटनांमध्ये १९ जणांचा मृत्यू झाला. बियास, गंगा, यमुनेसह बहुतांश नद्या दुथडी भरून वाहात असून अचानक आलेल्या पुरामुळे अनेक भागांतील रस्ते वाहतूक खोळंबली आणि लोक अडकून पडले. राजधानी दिल्ली आणि गुरुग्रामसह उत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये पाणी साठल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला. जलमय झालेले रस्ते, अडकून पडलेली वाहने आणि पाणी भरलेले भुयारी मार्ग यामुळे नागरिकांचे अतोनात हाल झाले.

 हिमाचल प्रदेशात दरडी कोसळण्याच्या तीन वेगवेगळय़ा घटनांमध्ये पाच जण ठार झाले. गेल्या ३६ तासांत राज्यात दरडी कोसळण्याच्या १४ मोठय़ा घटना आणि १३ ठिकाणी आकस्मिक पुराची नोंद झाली असून, सातशेहून अधिक रस्ते बंद करण्यात आले असल्याची माहिती हिमाचल प्रदेशच्या आपत्कालीन कक्षाने दिली. सिमला येथे घर कोसळून तिघांचा मृत्यू झाला तर कुलू आणि मनालीमध्ये प्रत्येकी एकाचा बळी गेला. शेजारील उत्तराखंडमध्ये, ऋषिकेश-बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर गुलारनजीक भूस्खलन झाल्यामुळे भाविकांना घेऊन जाणारी एक जीप नदीत कोसळल्याने तीन भाविक गंगेत बुडाले. अन्य पाच जणांची सुटका करण्यात आली असून तिघांचा शोध सुरू आहे.  जम्मू-काश्मीरच्या दोडा जिल्ह्यात एक प्रवासी बस भूस्खलनाच्या तडाख्यात सापडल्याने दोन जण ठार झाले. उत्तर प्रदेशातील कौशंबी जिल्ह्यात अंगावर झाडाची फांदी पडल्यामुळे एका १० वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. हिमाचल प्रदेशच्या लाहोल व स्पिती येथील चंद्रतालमध्ये आकस्मिक पुरामुळे सुमारे दोनशे लोक अडकून पडले आहेत. बियास नदीच्या वाढत्या पाण्यामुळे चंदीगड- मनाली महामार्गाचा काही भाग वाहून गेला. मनालीमध्ये काही दुकाने वाहून गेली, तसेच कुलू, किन्नौल व चंबा येथील नाल्यांच्या पुरामध्ये वाहने वाहून गेली असे वृत्त आहे.

काश्मीरला तडाखा

जम्मू व काश्मीरच्या उंचावरील भागांमध्ये, तसेच लडाखमध्ये हिमवर्षांव झाल्याचे वृत्त असून, या भागात पावसाचा रेड अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. जम्मू- काश्मीरच्या कठुआ व सांबा जिल्ह्यांत पाणलोट भागांमधील नद्या व ओढय़ांतील पाणी धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याने या ठिकाणांसाठी रेड अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. 

पंजाब, हरियाणात फटका

पंजाब व हरियाणाच्या अनेक भागांनाही पावसाचा जोरदार फटका बसला. सखल भागांमध्ये मोठय़ा प्रमाणावर पाणी साठले असून पुराचा सर्वाधिक तडाखा बसलेल्या भागांमध्ये अधिकारी रवाना झाले आहेत. हरियाणात गुरुग्रामच्या अनेक भागांत जोरदार पावसामुळे मोठय़ा प्रमाणात पाणी साठले आणि वाहतुकीचा खोळंबा झाला. कंपन्यांनी सोमवारी आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याच्या सूचना द्याव्यात व शाळांनी सुटी जाहीर करावी, असा सल्ला प्रशासनाने दिला आहे.

रेल्वेला फटका

मुसळधार पावसाचा रेल्वे सेवांनाही फटका बसला आहे. १७ रेल्वेगाडय़ा रद्द करण्यात आल्या असून, १२ गाडय़ांचा मार्ग बदलण्यात आल्याचे उत्तर रेल्वेने सांगितले. पाणी साठल्यामुळे चार ठिकाणची रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली आहे.

आठ दिवसांत तुटीची भरपाई

देशात उशिरा दाखल झालेल्या मोसमी पावसाने अवघ्या आठ दिवसांमध्ये १० टक्के तुटीची भरपाई केली आहे. भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत देशात एकत्रितरीत्या २४३.२ मिमी पावसाची नोंद झाली असून तो सरासरीच्या २ टक्के जास्त आहे. विशेष म्हणजे जुलैच्या पहिल्या आठ दिवसांतच पावसाने तूट भरून काढली असली तरी काही ठिकाणी पूर तर काही ठिकाणी दुष्काळ असे विषम चित्र बघायला मिळत आहे.

केंद्रीय गृहमंत्र्यांकडून आढावा

उत्तर भारतातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आढावा घेतला. दिल्ली आणि जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल तसेच पंजाब, हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांनी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. या राज्यांमधील परिस्थिती आणि प्रशासनाच्या तयारीचा शहा यांनी आढावा घेतला. अमरनाथ यात्रेकरूंच्या सुरक्षेबाबतही त्यांनी चर्चा केली.

दिल्लीत आज शाळांना सुट्टी

  • राजधानी दिल्लीमध्ये रविवारी एका दिवसाच्या पावसाने ४१ वर्षांचा विक्रम मोडीत काढला.
  • १९८२ सालानंतर जुलै महिन्यात प्रथमच सकाळी साडेआठला संपलेल्या २४ तासांत दिल्लीत १५३ मिमी पावसाची नोंद झाली.
  • हरियाणातील हाथनीकुंड जलसाठय़ातून १ लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने मंगळवारी यमुना नदी धोक्याची पातळी ओलांडेल, असा इशारा देण्यात आला आहे. ’या पार्श्वभूमीवर दिल्ली, नॉएडा व गुरूग्राममधील शाळांना सोमवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
  • या पार्श्वभूमीवर दिल्ली, नॉएडा व गुरूग्राममधील शाळांना सोमवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.