Holkar College Holi Fest: मध्य प्रदेशमधील शासकीय होळकर विज्ञान महाविद्यालयात एक अजब प्रकार घडला आहे. विद्यार्थ्यांनी होळी सणानिमित्त महाविद्यालयाच्या आवारात ७ मार्च रोजी आयोजित केलेल्या होळकर होळी महोत्सवाला मुख्याध्यापकांनी नकार दिला होता. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, विद्यार्थ्यांनी होळीनिमित्त डीजे आणि रेन डान्सचे आयोजन केलं होतं. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना १५० रुपेय प्रवेश शुल्क ठेवले गेले होते. मात्र महाविद्यालयाने कार्यक्रमाला नकार देताच विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांसह १५० प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना एका हॉलमध्ये कोंडलं होतं. या प्रकरणी चार विद्यार्थी नेत्यांना दोषी ठरविण्यात आलं असून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, होळकर महाविद्यालयाने होळीच्या कार्यक्रमासाठी परवानगी नाकारली होती. तरीही विद्यार्थी नेत्यांनी या कार्यक्रमाचे पत्रक महाविद्यालयात लावले होते. यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. सदर प्रकरणाची जिल्हा प्रशासनाने चौकशी केली होती.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, २३ फेब्रवारी रोजी विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांची परवानगी नसतानाही होळीच्या कार्यक्रमाचे पत्रक महाविद्यालयात चिकटवले. महाविद्यालय प्रमुखांनी सूचना दिल्यानंतर सदर पत्रके काढून टाकण्यात आली. मात्र महाविद्यालयाच्या या कृतीविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले. २४ फेब्रुवारी रोजी महाविद्यालयाच्या यशवंत सभागृहात मुख्याध्यापकांसह प्राचार्य आणि इतर कर्मचाऱ्यांची बैठक सुरू असताना विद्यार्थ्यांनी सभागृहाचा दरवाजा बाहेरून बंद केला.
घटनेचा तपास करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्याने सांगितले की, या १५० जणांमध्ये महिलाही होत्या. विद्यार्थ्यांनी जवळपास ३० मिनिटे सर्वांना कोंडून ठेवले होते. मुख्याध्यापिका अनामिका जैन म्हणाल्या की, जिल्हा प्रशासनाने चौकशी केल्यानंतर चार विद्यार्थ्यांना दोषी ठरवले आहे. विद्यार्थ्यांनी शिस्तभंगाचा गंभीर असा गुन्हा केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात अतिशय कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली गेली. त्यामुळे चारही विद्यार्थ्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात येत असून त्यांना स्थलांतर दाखलाही तात्काळ देण्यात आला.
मध्य प्रदेशमधील होळकर महाविद्यालयाची स्थापना १८९१ साली झाली होती. इंदूर येथे होळकर यांचे संस्थान असताना महाविद्यालय उभे राहिले होते.
© IE Online Media Services (P) Ltd