पीटीआय, बंगळूरु : Karnataka elections 2023 कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी २२४ मतदारसंघांसाठी ३ हजार ६०० पेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले. अनेक उमेदवारांनी एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यामुळे दाखल झालेल्या एकूण अर्जाची संख्या ५ हजार १०२ इतकी झाली आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी, म्हणजे गुरुवारी १ हजार ६९१ उमेदवारांनी अर्ज भरले. अर्जाची छाननी शुक्रवारी होणार असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.
कर्नाटकात १३ एप्रिलपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती, अर्ज मागे घेण्याची अखेरची मुदत २४ एप्रिल ही आहे. मतदान एकाच टप्प्यात १० मे रोजी होणार आहे, तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक अर्ज भरणाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा कमी आहे. दाखल झालेल्या अर्जापैकी ४ हजार ७१० अर्ज हे ३ हजार ३२७ पुरुष उमेदवारांनी भरले आहेत. तर ३०४ महिला उमेदवारांनी ३९१ अर्ज भरले आहेत. एक अर्ज तृतीयपंथीय उमेदवाराने भरला आहे अशी माहिती कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकऱ्यांनी दिली. स्वत:ला भाजपचे म्हणवणाऱ्या उमदेवारांनी ७०७ अर्ज भरले आहेत, काँग्रेसच्या ६५१ तर धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या उमेदवारांनी ४५५ अर्ज भरले आहेत. उर्रविरत अर्ज लहान पक्ष आणि अपक्षांनी भरले आहेत. एक उमेदवार जास्तीत जास्त ४ अर्ज भरू शकतो.
भारत राष्ट्र समितीचा ‘जेडीएस’ला पाठिंबा
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत तेलंगणामधील सत्ताधारी भारत राष्ट्र समितीने (बीआरएस) धर्मनिरपेक्ष जनता दलाला (जेडीएस) पाठिंबा जाहीर केला. कर्नाटकात जेडीएस निवडणूक लढवत असल्यामुळे आपण ही निवडणूक लढवणार नाही असे बीआरएसने जाहीर केले आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तेलंगणा राष्ट्र समितीने आपले नाव बदलून भारत राष्ट्र समिती हे नाव घेतले. पक्षाला राष्ट्रीय पातळीवर राजकारण करायचे आहे असे त्या वेळी सांगण्यात आले होते. मात्र, कर्नाटकात जेडीएसविरोधात उमेदवार द्यायचे नसल्यामुळे निवडणूक लढवत नसल्याचे पक्षातर्फे सांगण्यात आले. गेल्या काही महिन्यांत बीआरएसने महाराष्ट्रात कार्यकर्ते आणि नेते तयार करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आतापर्यंत पक्षाच्या नांदेडमध्ये दोन सभा झाल्या असून २४ एप्रिलला छत्रपती संभाजीनगर येथे सभा होणार आहे.