पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात दोन आदिवासी महिलांना नग्न करून मारहाण करण्यात आली आहे. स्थानिक दुकानदार महिलांनी चोरीच्या आरोपाखाली या दोन महिलांना बेदम मारहाण केली आहे. यावेळी आरोपी महिलांनी पीडित महिलांच्या अंगावरील कपडे फाडले. यानंतर अर्धनग्न अवस्थेत त्यांची धिंड काढल्याचीही माहिती मिळत आहे. याप्रकरणी पश्चिम बंगाल पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास केला जात आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

‘इंडियन एक्स्प्रेस’नं दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना १९ जुलै रोजी मालदा जिल्ह्यातील बामनगोला येथील आठवडी बाजारात घडली. मालदा जिल्ह्यातील माणिकचक परिसरातील पाच आदिवासी महिला आपली स्थानिक उत्पादनं विकण्यासाठी आठवडी बाजारात आल्या होत्या. यावेळी त्यांना इतर महिलांनी चोरी करताना पकडलं. यातील तीन महिला पळून जाण्यात यशस्वी झाल्या पण दोन महिलांना इतर महिलांनी बाजारपेठेत पकडून मारहाण केल्याचा आरोप आहे.

हेही वाचा- “आधी भावाची हत्या केली मग बहिणीला नग्न करत धिंड काढली”, मणिपूरमध्ये त्यादिवशी नेमकं काय घडलं?

या घटनेच्या व्हिडीओ फुटेजमध्ये महिलांचा एक गट दोन महिलांना चपलनं मारहाण करताना आणि त्यांचे कपडे फाडताना दिसत आहे. आरोपी महिलांनी पीडित महिलांच्या अंगावरील सर्व कपडे फाडत त्यांना मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.