5-Year-old boy beheaded in front of mother Crime News : आईच्या समोरच विकास नावाच्या एका ५ वर्षीय मुलाचे एका व्यक्तीने शिर धडावेगळे केल्याचा धक्कादायक प्रकार मध्यप्रदेश येथे शुक्रवारी समोर आला. मिळालेल्या माहितीनुसार, मानसिकदृष्ट्या अस्थिर असलेल्या एका व्यक्तीने कोणतेही कारण नसताना या मुलाची हत्या केली.
या घटनेबद्दल प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महेश (२५) हा दुचाकीवरून आला आणि कालू सिंग यांच्या घरात घुसला. या कुटुंबाने त्याला यापूर्वी कधीही पाहिलेले नव्हते. एकही शब्द न बोलता महेशने अचानक घरात पडलेले फावड्यासारखे एक धारदार अवजार उचलले आणि मुलावर हल्ला केला. या हल्ल्यात आरोपीने त्या मुलाचे डोके धडावेगळे केले. त्यानंतर हल्लेखोराने त्याच्या खांद्यावरही वार केला, ज्यामुळे त्या मुलाच्या मृतदेह छिन्नविच्छिन्न झाला.
या घटनेदरम्यान मुलाला वाचवण्यासाठी आईने निकराचे प्रयत्न केले, ज्यादरम्यान तिला देखील दुखापत झाली. या संपूर्ण प्रकारामुळे ती देखील धक्क्यात गेली आहे. या भयंकर घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी पोलीस घटनास्थळी दाखल होण्याच्या आधी आरोपीला पकडून बेदम मारहाण केली.
धारचे पोलीस अधीक्षक (SP) मयंक अवस्थी यांनी ही घटना अत्यंत हृदद्रावक असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी दुजोरा दिला की लोकांनी केलेल्या मारहाणीनंतर आरोपीचा रुग्णालयात घेऊन जात असताना मृत्यू झाला. “मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल. पण प्राथमिक तपासात तो मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे दिसून येत आहे,” अवस्थी यांनी सांगितले.
आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्याच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी केली जात आहे.
तपासात आढळून आले की महेश हा अलीराजपूर जिल्ह्यातील जोबट बागडी येथील रहिवासी होता. त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले की, गेले तीन ते चार दिवस तो मानसिकदृष्ट्या अस्थिर होता आणि घरातून बेपत्ता झाला होता. या भयानक हत्येच्या अवघ्या एक तास आधी, त्याने जवळच्या एका दुकानातून वस्तू चोरण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप आहे.