परदेशात चांगल्या आयुष्याच्या शोधात भारतातून हजारो लोक दरवर्षी स्थलांतर करतात. बरेच जण एजंट्सवर विश्वास ठेवून, त्यांच्या जमिनी विकून, घरे गहाण ठेवून हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जातात. मात्र रविवारी पहाटे असेच चुकीच्या मार्गांनी अमेरिकेत गेलेल्या हरियाणातील २५ ते ४० वयोगटातील ५० पुरुषांना भारतात परत आणण्यात आले आहे. अमेरिकेत अवैध स्थलांतरितांवर कारवाई सुरू करण्यात आली असून यामध्ये सापडल्यानंतर त्यांना माघारी पाठवण्यात आले आहे. वाईट बाब म्हणजे या सगळ्यातून त्यांच्या पदरी निराशा तर पडलीच पण अनेकांनी ते कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले असल्याचाही दावा केला आहे.

हरियाणातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात परतलेल्यांपैकी १६ जण करनालचे, १४ कैथल, ५ कुरुक्षेत्र आणि एक जण पानिपत येथील आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, या सर्व जणांनी अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी ‘डाँकी (Donkey)’ किंवा ‘डंकी (Dunki)’ मार्गाचा वापर केला होता. हे एक मानवी तस्करीच्या मार्गांचे जाळे आहे, ज्याच्याद्वारे दक्षिण आणि मध्य अमेरिकेतून घुसघोरी होते. असा मार्ग वापरून गेलेल्या काहींनी अमेरिकेत अनेक वर्ष वास्तव्य केले, तर काहीजण फक्त काही महिनेच तेथे राहिले . मायदेशी परत पाठवण्यापूर्वी यापैकी काहींना तुरुंगातही पाठवण्यात आले होते.

यापैकी अंकुर सिंह (२६) या करनालच्या राहरा गावातील रहिवासी असलेल्या व्यक्तीने सांगितले की, त्याने ऑक्टोबर २०२२ मध्ये अमेरिकेत जाण्यासाठी २९ लाख रुपये खर्च केले होते. यासाठी त्याने दक्षिण अमेरिकेतील अनेक देशांमधून प्रवास केला आणि त्यासाठी त्याला चार महिने लागले. “मी डंकी मार्ग वापरला होता आणि या वर्षी फेब्रुवारी पर्यंत सर्वाकाही ठीक चालले होते, “जेव्हा मला जॉर्जिया येथे अटक झाली तेव्हा मी एका दारूच्या दुकानात काम करत होतो,” असे अंकुर याने द इंडियन एक्सप्रेसला सांगितले.

“त्यानंतर मला एका कॅम्पमध्ये ठेवण्यात आले. आम्हाला २४ ऑक्टोबर रोजी भारतात परत आणण्यासाठी विमानात बसवण्यात आले. हरियाणामधील ५० लोकांव्यतिरिक्त, विमानात पंजाब, हैदराबाद, गुजरात आणि गोवा येथील तरुणांचा समावेश होता,” असेही तो म्हणाला. अमेरिकेला जाण्याच्या आधी आपण करनालच्या डीएव्ही कॉलेजमध्ये बीएससीचे शिक्षण घेत होतो असेही त्याने सांगितले.

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२५ पासून सुमारे २५०० भारतीय नागरिकांना आठ लष्करी, चार्टर आणि व्यावसायिक विमानांमधून अमेरिकेतून माघारी पाठवण्यात आले आहे. यामध्ये अमेरिकेच्या हवाई दलाचे C-17 हे विमान पहिल्यांदा १०४ भारतीयांना घेऊन ५ फेब्रुवारी रोजी अमृतसरमध्ये उतरले होते. माघारी पाठवलेल्या लोकांमध्ये पंजाब, हरियाणा आणि गुजरात येथील पुरुषांची संख्या सर्वाधिक आहे.

कैथलमधील तारागढ गावातील रहिवासी असलेला नरेश कुमार हा एक वर्षापेक्षा जास्त काळ डिटेंशनमध्ये राहिल्यानंतर भारतात परतला. त्याने सांगितले की, “प्रवासादरम्यान आम्हाला हातकड्या घालण्यात आल्या होत्या, पण त्यांनी आमच्याशी गैरवर्तन केले नाही. परत पाठवण्यापूर्वी मी तिथे १४ महिने तुरुंगात होतो.”

“मी ९ जानेवारी २०२४ रोजी दिल्ली सोडली आणि ६६ दिवसांनंतर ब्राझीलमार्गे अमेरिकेत पोहोचलो. माझ्या एजंट्सनी माझी फसवणूक केली. त्यांनी माझ्याकडून ५७.५ लाख रुपये घेतले. त्यांनी सुरुवातीला ४२ लाख रुपयांत पोहतवण्याचे आश्वासन दिले होते, पण नंतर ते आणखी पैसे मागत राहिले. मी माझी एक एकरपेक्षा जास्त जमीन विकली, ६ लाख रुपये व्याजाने उधार घेतले, माझ्या भावाने ६.५ लाखांना जमीन विकली आणि एका नातेवाईकाने २.८५ लाख रुपये दिले.”

कैथलच्या एसपी उपासना यांनी सांगितले की जिल्ह्यातील १४ जणांना रविवारी दुपारी २ च्या सुमारास दिल्लीत आणण्यात आले. त्या अधिकारी म्हणाल्या, “या सर्व लोकांनी डंकी मार्गाने अमेरिकेत प्रवेश केला होता. त्यापैकी एक जण एक्साइज प्रकरणात हवा होता आणि त्याने अनेक न्यायालयांच्या सुनावण्यांना गैरहजर राहिला होता.”