मागील दीड वर्षांपासून देशामधील करोनाचा फैलाव सुरु असून दुसरी लाट ओसरल्यानंतर आजही दिवसाला ३५ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून येत आहेत. केंद्र सरकारकडून रोज करोनासंदर्भातील आकडेवारी जारी करण्यात येते. मात्र या आकडेवारीवर खास करुन संसर्ग झालेल्यांची आकडेवारी आणि करोना मृतांच्या आकडेवारीसंदर्भात देशातील जनतेला केंद्रात सत्तेत असणाऱ्या मोदी सरकारवर विश्वास उरलेला नसल्याचं इंडिया टुडेच्या सर्वेक्षणामधून समोर आलं आहे. ‘मूड ऑफ द नेशन’ सर्वेक्षणामध्ये केंद्र सरकारने सांगितलेल्या आकडेवारीपेक्षा करोनामुळे अधिक जणांचा मृत्यू झाला असल्याचं मत व्यक्त करणाऱ्यांची संख्या तब्बल ७१ टक्के आहे.

नक्की वाचा >> करोनाने लावला मोदींच्या लोकप्रियतेला सुरुंग; ६६ टक्क्यांवरुन थेट २४ टक्क्यांवर घसरण

या सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या ७१ टक्के जनतेने मोदी सरकारच्या आकडेवारीवर विश्वास नसल्याचं मत व्यक्त केलंय. केंद्र सरकार सांगतंय त्यापेक्षा करोनामुळे अधिक मृत्यू झाले आहेत असं मत व्यक्त करणाऱ्यांची संख्या ७१ टक्के इतकी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता मागील वर्षभरामध्ये तब्बल ४२ टक्क्यांनी कमी झाली आहे. मागील वर्षी ६६ टक्के लोकांनी पुढील पंतप्रधान म्हणून मोदींना पसंती दर्शवली असतानाच यंदा मात्र अवघ्या २४ टक्के लोकांनी मोदींच्या बाजूने कौल दिलाय. इंडिया टुडेने घेतलेल्या ‘मूड ऑफ द नेशन’ सर्वेक्षणामधून ही माहिती समोर आलीय.

नक्की वाचा >> पंतप्रधान मोदी दिवसातून एकदाच जेवतात; त्यांनीच सांगितलं यामागील कारण, म्हणाले…

पंतप्रधान मोदींची लोकप्रियता कमी होण्यामागील सर्वात महत्वाचं कारण म्हणजे करोना परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकारला आलेलं अपयश. “करोनाची पहिली लाट आली तेव्हा पंतप्रधान मोदींची नेता म्हणून लोकप्रियता जानेवारी २०२१ मध्ये ७३ टक्के इतकी होती. मात्र दुसऱ्या लाटेमधील केंद्र सरकारचा कारभार आणि त्यामुळे सर्वसामान्यांना झालेल्या अडचणी यामुळे मोदींची लोकप्रियता ४९ टक्क्यांनी कमी झालीय,” असं इंडिया टुडेच्या या सर्वेक्षण अहवालात म्हटलं आहे.

निवडणूक प्रचार सभांमुळेच देशामध्ये करोनाची दुसरी लाट आल्याचं मत २७ टक्के भारतीयांनी व्यक्त केलं आहे. तर २६ टक्के लोकांनी करोना संदर्भातील नियमांचं पालन न केल्याने दुसरी लाट आल्याचं मत व्यक्त केलंय. तर मोदी सरकारला करोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याचं मत २०२० साली ऑगस्ट महिन्यात २३ टक्के लोकांनी व्यक्त केलेलं. आता एका वर्षानंतर मोदी सरकारच्या करोनासंदर्भातील कामावर नाराज असणाऱ्यांची संख्या वाढून ४९ टक्क्यांवर गेलीय.

देशासमोरील सर्वात मोठा प्रश्न हा करोना परिस्थिती असल्याचं मत २३ टक्के लोकांनी व्यक्त केलंय. २९ टक्के लोकांनी महागाई आणि वाढत्या किंमती हे मोदी सरकारचं सर्वात मोठं अपयश असल्याचं मत व्यक्त केलंय तर २३ टक्के लोकांनी बेरोजगारांची वाढती संख्या हे मोदी सरकारचं अपयश असल्याचं म्हटलं आहे.

सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ४४ टक्के लोकांनी सध्या निर्माण झालेलं आरोग्यासंदर्भातील संकट हे केंद्र आणि राज्य दोन्हींची समान जबाबदारी असल्याचं म्हटलंय.

कसं करण्यात आलं सर्वेक्षण?

हे सर्वेक्षण १० जुलै ते २२ जुलैदरम्यान १९ राज्यांमध्ये करण्यात आलं. यामध्ये लोकसभेच्या ११५ तर विधानसभेच्या २३० मतदारसंघांमधील १४ हजार ५९९ जणांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्यांपैकी ७१ टक्के लोक हे ग्रामीण तर २९ टक्के लोक हे शहरी भागातील होते.

करोनाची सरकारी आकडेवारी काय सांगते?

देशात गेल्या २४ तासांत ३६ हजार ५७१ करोनाबाधित आढळले असून ५४० जणांचा मृत्यू झाला आहे. नवीन रुग्णांसह देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ३ लाख ६३ हजार ६०५ वर पोहोचली आहे. ही रुग्णसंख्या गेल्या १५० दिवसांतील सर्वात कमी आहे. तर गेल्या २४ तासांत ३६ हजार ५५५ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण ३ कोटी १५ लाख ६१ हजार ६३५ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या देशाचा रिकव्हरी रेट ९७.५४ टक्क्यांवर आहे.

करोना मृतांची संख्या किती?

देशात करोनामुळे आतापर्यंत ४ लाख ३३ हजार ५८९ रुग्ण दगावले आहेत. सध्या विकली पॉझिटीव्हीटी रेट १.९३ टक्क्यांवर आहे. हा दर गेल्या ५६ दिवसांपासून ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे. तर, डेली पॉझिटीव्हीटी रेट १.९४ टक्के असून हा दर गेल्या २५ दिवसांपासून सलग ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे. आतापर्यंत ५०.२६ कोटी करोनाचा चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर, लसीकरण मोहिमेअंतर्गत ५७.२२ कोटी नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे.