Pregnant Woman From West Bengal Deported To Bangladesh: काही महिन्यांपूर्वी बांगलादेशी स्थलांतरित असल्याच्या संशयावरून आठ महिन्यांची गर्भवती असलेल्या सुनाली बीबी, तिचा पती आणि त्यांच्या आठ वर्षांच्या मुलाला दिल्लीत ताब्यात घेऊन बांगलादेशात रवानगी करण्यात आली होती. यानंतर काल (गुरुवारी) पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील असलेल्या या कुटुंबाला बांगलादेश पोलिसांनी बेकायदेशीर घुसखोर असल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.

बांगलादेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनाली बीबी, त्यांचे पती आणि आठ वर्षांच्या मुलाला चैपनावाबगंज जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. याचबरोबर पश्चिम बंगालमधील आणखी एक कुटुंब, स्वीटी बीबी (३२) आणि त्यांच्या ६ व १६ वर्षांच्या दोन मुलांनाही या परिसरातून अटक करण्यात आली आहे.

कोलकाता उच्च न्यायालयात दोन्ही महिलांच्या कुटुंबियांनी दाखल केलेल्या हेबियस कॉर्पस याचिकांवर सुनावणी सुरू असताना ही घटना घडली आहे.

“या कुटंबाची आसामच्या सीमेवर असलेल्या कुरीग्राम येथून बांगलादेशात रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर, ते काही दिवस ढाक्यामध्ये रस्त्यावरच राहिले. गेल्या महिन्याभरापासून ते चपाइनवाबगंज जिल्ह्यात राहत होते. आम्ही त्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून आम्हाला भारतीय कागदपत्रे सापडली आहेत. त्यांना आज (शुक्रवारी) न्यायालयात हजर केले जाणार आहे. याबाबतचा निर्णय न्यायालय घेईल. आमच्या देशाच्या कायद्यानुसार सर्व कायदेशीर कार्यवाही केली जाईल. या प्रकरणात महिला आणि मुलांचा समावेश असल्याने, आम्ही हा मुद्दा योग्य आदर आणि सहानुभूतीने हाताळत आहोत”, असे चपाइनवाबगंजचे पोलीस अधीक्षक रेझाउल करीम यांनी बांगलादेशहून फोनवरून द इंडियन एक्सप्रेसला सांगितले.

सुनाली बीबी यांचे कुटुंब पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्य गेल्या दोन दशकांपासून दिल्लीत कचरा वेचण्याचे आणि घरकामाचे काम करत आहेत.

सुनालीप्रमाणेच, स्वीटी बीबी (३२) आणि त्यांची दोन अल्पवयीन मुले, बीरभूम जिल्ह्यातील एका गावातील आहेत. त्यांनाही त्याच वेळी ताब्यात घेऊन बांगलादेशात पाठवण्यात आले होते. दोन्ही कुटुंबांना दिल्लीच्या केएन काटजू मार्ग पोलीस ठाण्यात ताब्यात घेण्यात आले आणि नंतर त्यांना हद्दपार करण्यात आले होते.

हद्दपारीनंतर बांगलादेशातील अज्ञात ठिकाणाहून मदतीसाठी आवाहन करणाऱ्या सुनाली बीबी आणि इतरांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.