Tirupati Balaji Temple Use Of Desi Cow Milk: प्रसिद्ध तिरुपती वेंकटेश्वर बालाजी मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानमला भगवान वेंकटेश यांच्या पूजा आणि भोगप्रसादासाठी फक्त देशी गायींचे दूध वापरावे, असे निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. यावेळी न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती एन. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याला उच्च न्यायालयात जाण्याची मुभा देत याचिका मागे घेण्याची परवानगी दिली.
सुनावणीदरम्यान, न्यायमूर्ती सुंदरेश यांनी निरीक्षण नोंदवले की, “गाय ही गाय असते. देवावरील खरे प्रेम हे या मुद्द्यांमध्ये अडकण्याऐवजी सहप्राण्यांची सेवा करण्यात आहे. समाजात यापेक्षाही बरेच महत्त्वाचे मुद्दे आहेत.” खंडपीठाने पुढे म्हटले की, या टिप्पण्या “पूर्ण आदराने” केल्या जात आहेत.
याचिकाकर्त्याच्या वकिलाने असा युक्तिवाद केला की, आगमशास्त्रांनुसार यामध्ये स्पष्ट फरक आहे आणि देशी गायीचे दूध वापरणे ही एक आवश्यक परंपरा आहे. यावेळी वकिलाने आग्रह धरला की विधीशास्त्रांचे पालन केले पाहिजे. तिरुमला तिरुपती देवस्थानमकडे या संदर्भात एक प्रस्ताव आणि आदेश होता, जो याचिकाकर्ता फक्त अंमलात आणण्याची मागणी करत आहे.
उत्तरात, न्यायमूर्ती सुंदरेश यांनी टिप्पणी केली की, “असे वर्गीकरण मानवनिर्मित आहे आणि ते भाषा, जात, समुदाय किंवा राज्यावर आधारित आहे आणि देवाने ठरवलेले नाही. देव सर्वांसाठी समान आहे. तो इतर प्राण्यांशीदेखील दयाळू आणि न्याय्य आहे. तुम्ही असे म्हणू शकत नाही की देवाला फक्त देशी गायीचे दूध हवे आहे. देवाकडे दुसरे काहीतरी पाहिजे असले, नाही का?”
याचिकाकर्त्याच्या दाव्याला मान्यता देण्यासाठी कोणता कायदेशीर आदेश आहे का, असा प्रश्नही खंडपीठाने उपस्थित केला. वकिलाने घटनात्मक खंडपीठाच्या निर्णयांचा हवाला देऊन न्यायालयाला या मुद्द्यावर किमान टीटीडीचा प्रतिसाद मागण्याची विनंती केली, तेव्हा न्यायमूर्ती सुंदरेश यांनी म्हटले, “आता आपण असे म्हणू का की तिरुपती लाडू देखील स्वदेशी असावेत?”
प्रकरणाचा निर्णय देताना न्यायालयाने नमूद केले की ते याचिकेवर विचार करण्यास इच्छुक नाहीत. याचिकाकर्त्याच्या विनंतीनुसार, त्यांनी संबंधित उच्च न्यायालयात जाण्याच्या स्वातंत्र्यासह याचिका मागे घेण्याची परवानगी दिली.