पीटीआय, नवी दिल्ली/श्रीनगर

लाल किल्ल्याजवळील स्फोटापूर्वी उच्चशिक्षितांचे दहशतवादी प्रारूप उघड झाल्यावर संशयितांकडून जप्त केलेल्या स्फोटकांचा श्रीनगरच्या नौगम पोलीस ठाण्यात अपघाती स्फोट होऊन ९ जणांचा मृत्यू, तर ३२ जण जखमी झाले. एक विशेष पथक जप्त केलेल्या स्फोटकांच्या साठ्यांतून नमुने तपासत असताना शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. हा दहशतवादी हल्ला नाही, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शनिवारी स्पष्ट केले.

न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या (एफएसएल) पथकामधील तीन कर्मचारी, दोन छायाचित्रकार, दोन महसूल अधिकारी, राज्य तपास यंत्रणेचा एक अधिकारी आणि पथकाशी संबंधित एक असे नऊ जण या स्फोटात मृत्युमुखी पडल्याची माहिती जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक नलिन प्रभात यांनी दिली. तर २७ पोलीस, दोन महसूल अधिकारी आणि तीन स्थानिक जखमी झाले.

हरियाणाच्या फरिदाबाद येथून ९ आणि १० नोव्हेंबर रोजी अटक केलेल्या डॉ. मुझ्झमिल गनी याच्या घरातून जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी हा साठा जप्त केला. ट्रकमधून हा साठा श्रीनगरमध्ये आणला होता, तसेच नौगम पोलीस ठाण्यात ठेवण्यात आला होता, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

दहशतवादी प्रारूपप्रकरणी मूळ गुन्हा श्रीनगरच्या नौगाम पोलीस ठाण्यात दाखल आहे. त्यामुळे फरिदाबाद येथून ही स्फोटके नौगम पोलीस ठाण्यात नेण्यात आली होती. पोलीस महासंचालक प्रभात आणि गृह मंत्रालयाचे सहसचिव प्रशांत लोखंडे यांनी हा स्फोट दहशतवादी हल्ला नसल्याचे स्पष्ट केले. जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी या स्फोटांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

नेमके काय झाले?

– फरिदाबाद येथून जप्त केलेल्या स्फोटकांमधून नमुने घेण्याची प्रक्रिया पथकाकडून गेल्या दोन दिवसांपासून सुरू होती. या प्रक्रियेदरम्यान शुक्रवारी रात्री हा झाला.

– नमुने घेतलेल्या साहित्यात अंदाजे ३६० किलो स्फोटके होती. त्यामध्ये अमोनियम नायट्रेट, पोटॅशियम नायट्रेट आणि सल्फर आदी रसायनांचा समावेश होता.

– स्फोटामुळे नौगम पोलीस ठाण्याच्या इमारतीचे मोठे नुकसान झाले. तसेच शेजारच्या इमारतींवरही स्फोटाचा परिणाम झाला.

नौगम पोलीस ठाण्यात झालेल्या स्फोटाची घटना दु:खद आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आता संपला पाहिजे. सर्व राजकीय पक्षांनी दहशतवादाविरुद्ध एकत्र येणे आवश्यक आहे. – सुरिंदर चौधरी, उपमुख्यमंत्री, जम्मू आणि काश्मीर

केंद्र सरकार जबाबदारीपासून पळून जाऊ शकत नाही. दहशतवादाच्या संकटाविरुद्ध काँग्रेस खंबीरपणे उभी आहे. – मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस अध्यक्ष

लाल किल्ल्याजवळील स्फोटप्रकरणी चौघे ताब्यात

नवी दिल्ली/चंडिगड : लाल किल्ल्याजवळील स्फोटातील कारचालक डॉ. उमर नबी याच्या परिचयाच्या अल फलाह विद्यापीठामधील दोन डॉक्टर, तसेच पठाणकोठ येथून एका डॉक्टरसह चार जणांना ताब्यात घेतल्याचे अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले.

डॉ. मोहम्मद आणि डॉ. मुस्ताकिम अशी अल फलाह विद्यापीठामधील दोघा डॉक्टरांची नावे आहेत. तपास यंत्रणांनी पंजाबच्या पठाणकोट येथूनही एका ४५ वर्षीय डॉक्टरला ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी शनिवारी सांगितले. त्याने यापूर्वी अल फलाह विद्यापीठात काम केले होते.

हरियाणातील नूह जिल्ह्यातून तपास यंत्रणांनी दिनेश ऊर्फ डब्बू याला परवान्याशिवाय खते विकल्याबद्दल ताब्यात घेतले. दरम्यान, तपासयंत्रणांनी स्फोट झालेल्या ‘हुंडई आय२०’ कारजवळ पार्क केलेल्या डझनभर वाहनांचा शोध घेतला असून, त्यांच्या चालक आणि मालकांची चौकशी सुरू आहे.

अल फलाहविरोधात दोन गुन्हे विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) आणि राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेच्या (नॅक) कारवाईनंतर दिल्ली पोलिसांनी अल-फलाह विद्यापीठाविरुद्ध दोन स्वतंत्र ‘एफआयआर’ दाखल केले आहेत. विद्यापीठाने खोट्या मान्यतांद्वारे केलेली फसवणूक आणि बनावटगिरीबद्दल गुन्हे शाखेने ‘एफआयआर’ नोंदवले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.