Who was Radhika Yadav : गुरुग्राममध्ये नुकतीच एक धक्कादायक घटना घडली आहे. टेनिसपटू राधिका यादवची तिच्याच वडिलांनी गोळ्या घालून हत्या केली. या घटनेनंतर संपूर्ण गुरुग्राममध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आता नवी माहिती समोर आली आहे. राधिका यादवची हत्या करण्याआधी तिच्या वडिलांनी स्वतःचा जीव देण्याचा विचार केला होता, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. राधिका यादव हत्या प्रकरणानंतर संपूर्ण क्रीडा क्षेत्रातून संताप व्यक्त होत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राधिका यादव हत्या प्रकरणाच्या तपासात असं समोर आलं आहे की काही दिवसांपूर्वी राधिकाचे वडील दीपक यादव हा वझिराबाद येथील त्याच्या गावी गेला होता. तिथे काही गावकऱ्यांनी त्याच्यावर टीका करत त्याची थट्टा केली. तो एक चांगला पिता नाही, तो त्याच्या मुलीच्या कमाईवर जगत आहे, अशा प्रकारची थट्टा गावकऱ्यांनी केली. त्यामुळे दीपक यादवने मुलीची हत्या केल्याची माहिती सांगितली जाते. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
दरम्यान, दीपक यादव हा आपल्या गावावरून परतल्यानंतर दीपकने राधिकाशी संवाद साधत तिला तिची टेनिस अकादमी बंद करण्यास सांगितलं. पण राधिकाने अकादमी बंद करण्यास नकार दिला. त्यामुळे दीपक अस्वस्थ झाला. त्यानंतर तो तीन ते चार दिवस राधिकाबरोबर बोलला नाही. त्याच काळात त्यांने स्वतःचा जीव देण्याचा विचार केला होता, अशी माहिती समोर आल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी दीपकने पुन्हा राधिकाशी संवाद साधत अकादमी बंद करण्यास सांगितलं. मात्र, तेव्हाही तिने नकार दिल्याने त्याने तिच्यावर गोळी झाडल्याचा आरोप आहे. शवविच्छेदन अहवालामध्ये तिच्या छातीवर चार गोळ्या लागल्याचं समोर आलं आहे. घटनेच्या वेळी राधिकाची आई मंजू यादव देखील घरात उपस्थित होती. तसेच तिच्या पतीने एवढं कठोर पाऊल का उचललं? हे तिला माहित नसल्याचं तिने सांगितलं आहे.
कोण होती राधिका यादव?
२३ मार्च २००० साली जन्मलेली राधिका ही प्रतिभावान टेनिसपटू होती आणि तिची इंटरनॅशनल टेनिस फेडरेशन (ITF) मध्ये दुहेरी टेनिस खेळाडू म्हणून ११३ वी रँक होती. आयटीएफ डबल्समध्ये देखील टॉप दोनशे खेळाडूंमध्ये तिचा क्रमांक होता. महिला दुहेरी प्रकारात ती हरियाणात पाचव्या स्थानावर होती असे सांगितले जाते. राधिका यादव ही तिच्या बरोबरीच्या खेळाडूंपैकी ‘टॉप प्लेयर’ म्हणून म्हणून उदयास येत होती, असं बिझनेस स्टँडर्डने एका वृत्तात म्हटलं आहे.
राधिका यादव सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामसाठी रील्स बनवत असे, पण दुर्दैवाने हेच राधिकाच्या हत्येचे कारण बनल्याची शक्यता आहे. राधिकाचे माजी प्रशिक्षक मनोज भारद्वाज यांनी या प्रकाराबद्दल राधिकाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे आणि हे मोठे नुकासान असल्याचे म्हटले आहे. राधिका ही अत्यंत हुशार आणि होतकरू खेळाडू होती. तिने स्कॉटीश हाय इंटरनॅशनल स्कूलमधून पदवीचे शिक्षण घेतले होते. त्याच्या आधी २०१८ मध्ये तिने कॉमर्समधून १२वी उत्तीर्ण केली होती आणि शाळेच्या दिवसांपासूनच तिने टेनिस खेळण्यास सुरूवात केली होती.