सध्या चर्चेत असणारी परीक्षा आहे ती म्हणजे NEET. या परीक्षेतला घोळ काही थांबायचं नाव घेत नाहीये. अशात आता हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. दुसरीकडे इंडिया आघाडीने देशात आणि महाविकास आघाडीने महाराष्ट्रात या विरोधात सरकारवर टीकेचीही एकही संधी सोडलेली नाही. काही वेळापूर्वीच NEET च्या घोळामागे केंद्र सरकारचा हलगर्जीपणा अशी बोचरी टीका सुप्रिया सुळेंनी केली. आता प्रकाश राज यांनीही एक पोस्ट शेअर करत मोदींना टोला लगावला आहे.

नीट परीक्षेच्या गोंधळावरुन गदारोळ

‘नीट’ परीक्षेच्या निकालानंतर सुरू झालेल्या गोंधळाने राजकीय वळण घेतले. काँग्रेसने परीक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून अनियमितता झाल्याचा आरोप केला. या आरोपानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी परीक्षेदरम्यान कोणताही गोंधळ झालेला नाही, पेपरफुटीचे कोणतेही पुरावे नाहीत, अशी स्पष्ट भूमिका घेतली होती. ‘एनसीईआरटी’ने अभ्यासक्रमाचे केलेले ‘रॅशनलायझेशन’ आणि परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम कमी झाल्यामुळे गुणवंत वाढल्याचे व पुनर्परीक्षा घेतली जाणार नसल्याचे सांगितले होते. मात्र, दोनच दिवसांत त्यांनी भूमिका बदलली. ‘दोन ठिकाणी गैरप्रकार झाल्याची माहिती मिळाली आहे, हे प्रकरण सरकारने गांभीर्याने घेतले असून, त्यातील दोषींवर, मग तो कितीही मोठा अधिकारी असला, तरी कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच ‘एनटीए’मध्ये सुधारणांची आवश्यकता आहे. त्याबाबतही सरकार काम करत आहे,’ असे प्रधान यांनी सांगितले. दरम्यान, बिहार आणि गुजरातमध्ये पेपरफुटीच्या आरोपांबाबत पोलीस तपास सुरू आहे.

हे पण वाचा- “NEET परीक्षा रद्द होण्यामागे केंद्र सरकारचा हलगर्जीपणा, आम्ही आता..,” सुप्रिया सुळेंचा इशारा

समुपदेशन प्रक्रियेचं काय?

वाढीव गुण रद्द केल्यानंतर तांत्रिकदृष्ट्या अखिल भारतीय स्तरावर गुणवत्ता यादी नव्यानेच तयार केली पाहिजे. मात्र आतापर्यंत ‘एनटीए’ने त्याबाबत निश्चित असा काही निर्णय घेतल्याचे दिसून येत नाही. वाढीव गुण रद्द केल्यामुळे काही प्रमाणात गुणानुक्रमांमध्ये बदल होऊ शकतो, असे वाटते. त्यात काही विद्यार्थ्यांना समान गुणानुक्रम मिळू शकतो. आता वाढीव गुणांचा प्रश्न सुटला असला, तरी पेपरफुटीचे आरोप जास्त गंभीर आहेत,’ असे तज्ज्ञ मार्गदर्शक दुर्गेश मंगेशकर यांनी सांगितले. दरम्यान, निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेशासाठीची समुपदेशन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

NEET बाबत प्रकाश राज यांची पोस्ट काय?

प्रकाश राज यांनी एका बाजूला भारतात कुठे कुठे NEET चा घोळ झाला आहे त्याचा नकाशा पोस्ट केला आहे. इंडियन एक्स्प्रेसने जो नकाशा पोस्ट केला आहे तोच नकाशा प्रकाश राज यांनी पोस्ट केला आहे. तसंच एका बाजूला मोदी पेपर पेपर विकत नीट प्रश्नपत्रिका विकत आहेत असं दाखवण्यात आलं आहे. तसंच कॅप्शन दिलं आहे की तुम्ही जेव्हा नेते निवडताना चुकता तेव्हा.. तसंच जस्टआस्कींग हा हॅशटॅगही त्यांनी पोस्ट केला आहे. ज्याची चर्चा होते आहे.

प्रकाश राज यांनी मोदींची जी खिल्ली उडवली आहे त्याबाबत मोदी किंवा भाजपा नेते काही उत्तर देतात का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.