Gautam Adani On Hindenburg : हिंडेनबर्ग रिसर्चने केलेल्या आरोपांच्या प्रकरणात अदानी समूहाला मोठा दिलासा मिळाला आहे. देशाच्या भांडवली बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीने (SEBI) गुरुवारी अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर केलेले स्टॉक मॅनिप्युलेशनचे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच या आरोपाच्या प्रकरणात अदानी समूहाला सेबीने आता क्लीन चीट देत दिलासा दिला आहे.

दरम्यान, सेबीने अदानी समूहाला क्लीन चीट दिल्यानंतर उद्योगपती गौतम अदानी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘हिंडेनबर्ग रिसर्चने केलेले आरोप निराधार होते’, असं गौतम अदानींनी म्हटलं आहे. या संदर्भात त्यांनी एक्सवर एक सविस्तर पोस्ट शेअर करत भूमिका मांडली आहे. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.

गौतम अदानींनी काय म्हटलं?

“सखोल चौकशीनंतर सेबीने आम्ही नेहमीच सांगत आलेल्या गोष्टीची पुष्टी केली आणि पुन्हा एकदा सिद्ध केलं की हिंडेनबर्गचे दावे निराधार होते. पारदर्शकता आणि सचोटीने नेहमीच अदानी समूहाची व्याख्या केली आहे. या फसव्या आणि प्रेरित अहवालामुळे ज्या गुंतवणूकदारांचे पैसे गमावले त्यांच्या वेदना आम्हाला मनापासून जाणवतात. खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांनी देशाची माफी मागावी. भारताच्या संस्थांप्रती, भारताच्या लोकांप्रती आणि राष्ट्र उभारणीप्रती आमची वचनबद्धता अढळ आहे. सत्यमेव जयते! जय हिंद!”, असं गौतम अदानी यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सेबीने काय म्हटलं?

सेबीने अदानी समूहावरील आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत असं म्हटलं आहे. सेबीने गौतम अदानी, राजेश अदानी, अदानी पोर्ट आणि अदानी पॉवर याच्याविरोधात दंड किंवा कारवाईची शक्यताही नाकारली आहे. सेबीला कोणतेही उल्लंघन झाल्याचे आढळून आले नाही, संबंधित नसलेल्या पार्टीबरोबरच्या अशा प्रकारच्या व्यवहारांसाठी त्यावेळी रिलेटेड पार्टी डिलिंग्ज ही व्याख्या लागू नव्हती (ही व्याख्या २०२१ च्या सुधारणेनंतर लागू करण्यात आली) असे सेबीने दोन वेगवेगळ्या आदेशांमध्ये नमूद केले आहे. सेबीने असेही नमूद केले आहे की, कर्जांची व्याजासह परतफेड करण्यात आली, तसेच कोणताही निधी बाहेर वळवला गेला नाही. त्यामुळे कोणतीही फसवणूक किंवा ‘अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस’ झाली नाही. त्यामुळे अदाणी समूहाविरोधातील सर्व प्रकरणे रद्द करण्यात येत आहेत.

हिंडेनबर्गने काय आरोप केले होते?

उद्योगपती गौतम अदानी यांच्या मालकीच्या अदानी समूहातील कंपन्यांविषयी हिंडेनबर्ग रिसर्चच्या १०६ पानी अहवालात अनेक गंभीर मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. अदानी समूहातील कंपन्यांनी भांडवली बाजारात आपल्या समभागांचे भाव फुगवल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच अदानी समूहाने बोगस कंपन्या स्थापन करून त्यांच्या माध्यमातून गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोपही हिंडेनबर्गने केला होता. कंपनीने क्षमतेपेक्षा अधिक कर्ज घेतले असून, हे कर्ज मिळवण्यासाठी कंपनीने समभागांचे मूल्य फुगवून दाखवले, असा ठपका अहवालात ठेवण्यात आला होता.