Afghanistan big warning to Pakistan after peace talks fail : अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील इस्तंबूल येथे सुरू असलेल्या शांतता चर्चेची शेवटची फेरीही निष्फळ ठरली आहे. यानंतर तालिबान सरकारने शनिवारी स्पष्ट केले की, युद्धाच्या परिस्थितीत स्वतःचा बचाव करण्याचा त्यांना अधिकार आहे. अनेक फेऱ्यांच्या वाटाघाटींनंतरही दोन देशांमध्ये शांततेबद्दल सहमती होऊ शकलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून अफगाण-पाकिस्तान सीमेवर संघर्ष सुरू आहे आणि या संघर्षात अनेक नागरिक आणि सैनिकांचा जीव गेला आहे.
दरम्यान तुर्किये आणि कतारच्या मध्यस्थी करण्यात आलेल्या चर्चेत अपयश आल्याबद्दल अफगाणिस्तानने पाकिस्तानला जबाबदार धरले आहे. अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या मागण्या या अवाजवी असल्याचे म्हटले, ज्यामुळे शांतता प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला. तसेच यावेळी त्यांनी युद्धाच्या परिस्थितीत अफगाणिस्तानला ‘स्वत:चा बचाव करण्याच्या अधिकार’ असल्याच्या मुद्द्यावर देखईल जोर दिला, असे वृत्त अफगाण सरकारचे प्रवक्ते जबिउल्ला मुजाहिद यांच्या हवाल्याने एपी या वृत्तसंस्थेने दिले आहे .
मुजाहिद यांनी स्पष्ट केले की, “अफगाणिस्तानला प्रदेशात अस्थिरता नको आहे, आणि युद्धात उतरणे ही आमची पहिली निवड नाही”.
“जर युद्ध सुरू झालं, तर आम्हाला स्वतःचे रक्षण करण्याचा अधिकार आहे,” असेही मुजाहिद म्हणाल्याचे वृत्त एपीने दिले आहे. यापूर्वी एका लिखित निवेदनात ते म्हणाले होते की, “अफगाणिस्तान कोणालाही आपल्या भूमीचा वापर दुसऱ्या देशाच्या विरोधात करू देणार नाही, तसेच त्यांच्या सार्वभौमत्वाला किंवा सुरक्षेला धोका पोहोचवणाऱ्या कृतींना परवानगी देणार नाही.”
पाकिस्तानची युद्धाची धमकी
चर्चेची अखेरची फेरी सुरू होण्याच्या आधीच पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी अफगाणिस्तानला इशारा दिला होता की जर चर्चा अपयशी ठरली तर युद्ध होईल. पाकिस्तानच्या जिओ न्यूजशी बोलताना आसिफ म्हणाले होते की, “जर चर्चा अपयशी ठरली, फक्त युद्ध होईल,” अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारशी वाटाघाटींसाठी लष्करी संघर्ष हा शेवटचा पर्याय असेल का, असे त्यांना विचारण्यात आले होते. या मुलाखतीचा व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.”
तसेच शनिवारी आसिफ कथितपणे म्हणाले की, चर्चा संपली आहे. तसेच त्यांनी इशारा दिला की जोपर्यंत अफगाणिस्तानच्या बाजूने कोणतेही उल्लंघन होत नाही तोपर्यंतच सध्या सुरू असलेली युद्धबंदी टिकेल.
पाकिस्तान अफगाणिस्तान संघर्ष
दोन्ही देशांमध्ये ऑक्टोबर महिन्यापासून संघर्ष सुरु आहे. अफगाणिस्तानने काबुल शहरात झालेल्या दोन स्फोटांसाठी पाकिस्तानला जबाबदार धरल्यानंतर हा संघर्ष सुरू झाला होता. त्यानंतर तालिबानने प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानी चौक्यांवर हल्ले केले. ज्यामध्ये ५८ पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा दावा तालिबानने केला, तर पाकिस्तानने फक्त २३ सैनिक ठार झाल्याची पुष्टी केली होती.
सीमेवर संघर्ष सुरू झाल्यानंतर दोन्ही देशांमध्ये ४८ तासांचा युद्धविरामावर सहमती झाली होती. पण पाकिस्तानने पुन्हा अफगाण प्रदेशात एअरस्ट्राईक केल्याने तणाव वाढला. या हवाई हल्ल्यात ३ स्थानिक अफगाण क्रिकेटपटूंसह १० लोक ठार झाले होते. मात्र तुर्किये आणि कतार यांच्या मध्यस्थिनंतर दोन्ही देशांमधील संघर्ष थांबला.
