शुक्रवारी बंगळुरूमधील ४० शाळांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या तसंच दिल्लीतील जवळपास ५० शाळांना अशाच प्रकारच्या धमक्या मिळाल्या. बंगळुरूमधील शाळांमध्ये शोध पथके आणि चौकशी सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी दिल्लीतील जवळपास ५० शाळांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या. यामध्ये सिव्हिल लाईन्समधील सेंट झेवियर्स, पश्चिम विहारमधील रिचमंड ग्लोबल स्कूल, रोहिणीमधील अभिनव पब्लिक स्कूल आणि रोहिणीमधील द सॉवरेन स्कूल यांचा समावेश आहे. राजधानीतल्या शाळांना अशा धमक्या देण्याचा हा सलग चौथा दिवस आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, राजराजेश्वरी नगर आणि केंगेरीसह वविध भागातील खाजगी शाळा लक्ष्य केल्या जात आहेत. बंगळुरू शहर पोलिसांनी अलर्टसाठी शाळांमध्ये अनेक पथके तैनात केली आहेत.
शाळेत बॉम्ब असे शीर्षक असलेला ई-मेल roadkill333@atomicmail.io वरून अनेक संस्थांना पाठवण्यात आला होता. या मेलमध्ये असा दावा करण्यात आला होता की बॉम्ब शाळांमध्ये लपवण्याता आला होता आणि विद्यार्थ्यांचे काय होईल याचे हिंसक पद्धतीने वर्णन करण्यात आले होते. तुम्हाला सर्वांना त्रास सहन करावा लागतो. मला माझ्या आयुष्याचा खरोखरच तिरस्कार आहे असेही या मेलमध्ये लिहिले होते.
या आठवड्यात सुमारे १०० शाळांना मिळाल्या धमक्या
आठवड्याभरात भारतातील १००हून अधिक शाळांना धमकीचे संदेश आले आहेत. त्यापैकी ६० शाळा या दिल्लीतील होत्या. या धमक्या नंतर खोट्या असल्याचे सांगण्यात आले. ते एन्क्रिप्टेड नेटवर्क आणि व्हीपीएनवरून पाठवण्यात आले होते. त्यामुळे ट्रॅक करणे कठीण झाले होते.
४५ शाळांना पाठवलेल्या धमकीच्या ई-मेलमध्ये असा दावा करण्यात आला की शाळेतल्या खोल्यांमध्ये अनेक स्फोटके ठेवण्यात आली आहेत आणि कोणीही वाचू नये अशी त्यांची इच्छा आहे. बॉम्ब निकामी करणारे पथक आणि शोध पथके सध्या धमकी मिळालेल्या शाळांमध्ये तपासणी करत आहेत.
“मी तुमच्यातील प्रत्येकाला या जगातून घालवेन. एकही जीव वाचणार नाही,” असेही मेलमध्ये लिहिले होते.