Ahmedabad Air India Crash Survivor Viswashkumar Ramesh : अहमदाबादमध्ये १२ जून रोजी झालेल्या एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेतून बचावलेले एकमेव प्रवासी विश्वास कुमार रमेश हे आता शारीरिकदृष्ट्या बरे झाले असले तरी मानसिकदृष्ट्या अजूनही सावरलेले नाहीत. रमेश यांनी स्वतःच त्यांची व्यथा मांडली आहे. ते म्हणाले, मी त्या जीवघेण्या अपघातातून वाचलो मात्र, माझं आयुष्य आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही. रमेश यांनी नुकतीच बीबीसीला मुलाखत दिली. यावेळी ते म्हणाले, “मी त्या अपघातातून वाचलो, मी जिवंत आहे, पण दररोज मरतोय.”

विश्वासकुमार रमेश म्हणाले, “त्या अपघातातून मी एकटाच वाचलो. परंतु, मला आजही त्यावर विश्वास बसत नाही. माझ्यासाठी हा एक चमत्कार आहे. मात्र, त्या अपघातात मी माझ्या भावाला गमावलं आहे. तो माझ्यासाठी सर्वकाही होता. त्याने आयुष्यात प्रत्येक वेळी माझ्या खांद्याला खांदा लावून उभा राहिला.”

“पत्नी व मुलाशी बोलत नाही, एकटाच बसून राहतो”

रमेश यांनी सांगितलं की ते बऱ्याचदा एकटेच त्यांच्या खोलीत बसून राहतात. पत्नी व मुलाशी काहीच बोलत नाहीत. त्यांना असं पाहून त्यांच्या कुटुंबीयांना काळजी वाटते. रमेश म्हणाले, “आता मी एकटाच आहे. मी माझ्या खोलीत शांतपणे केवळ बसून राहतो. मी माझ्या पत्नीशी किंवा मुलाशी बोलत नाही. मला माझ्या घरात एकटं राहणं आवडतंय. त्या दुर्घटनेनंतर माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी सावरणं अवघड आहे. परंतु, आम्ही प्रयत्न करत आहोत.”

मी मानसिकरित्या सावरू शकलेलो नाही : विश्वासकुमार रमेश

“गेल्या चार महिन्यांपासून माझी आई दिवसभर दरवाजाबाहेर बसून राहते. ती कोणाशी बोलत नाही आणि काही करत नाही. शांतपणे बसून राहते. मी रात्रभर फक्त विचार करत असतो. मला मानसिक त्रास होतोय.”

माझे पाय, खांदे, गुडघे आणि पाठीला दुखापत झाली होती. अजूनही हे सगळे अवयव दुखत असतात. त्यामुळे मला काम करता येत नाही. मी कार देखील चालवू शकत नाही. मला कोणाच्या तरी आधाराशिवाय चालता येत नाहीये त्यामुळे माझी पत्नी मदत करते. मला पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसॉर्डर (पीटीएसडी) झाला आहे. मी भारतातून लीसेस्टर (यूके) आलोय आहे तेव्हापासून इथे कुठलेही उपचार मिळाले नाहीत.