Asaduddin owaisi Reaction On All Party Meeting : पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून त्यांना गोळ्या घालण्यात आल्या, अशी प्रतिक्रिया दिलेल्या एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी आता केंद्र सरकारविरोधात संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. सर्वपक्षीय बैठकीत फक्त पाच ते दहा खासदार असलेल्या पक्षांनाच आमंत्रण दिल्यावरून त्यांनी संताप व्यक्त केला आहे. यासंदर्भात त्यांनी एक्सवर पोस्ट केली आहे.

एक्सवरील पोस्टमध्ये असदुद्दीन ओवैसी म्हणतात, “पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात चर्चा करण्याकरता सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. यासंदर्भात मी किरेन रिजिजू यांना काल रात्री संपर्क साधला. ते म्हणाले की ५ ते १० खासदार असलेल्या पक्षांनाच या बैठकीचं आमंत्रण देण्यात येणार आहे. कमी सदस्य पक्षांना आमंत्रण का नाही? असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले की यामुळे बैठक लांबली जाईल. मग मी म्हणालो की आमच्यासारख्या लहान पक्षांचं काय मग?”

“ही भाजपाची किंवा इतर कोणत्याही पक्षाची अंतर्गत बैठक नाही. ही सर्वपक्षीय बैठक आहे. यामुळे दहशतवाद आणि दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशांना आपल्या देशातील एकतेचा संदेश मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व पक्षांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी अतिरिक्त वेळ काढू शकत नाहीत का?” असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला.

महत्त्वाच्या मुद्द्यावर आम्हालाही भूमिका मांडण्याचा अधिकार

“तुमच्या पक्षालाही बहुमत नाही. १ खासदार असलेला पक्ष असो वा १०० खासदार असलेला पक्ष असो, ते सर्व भारतीयांनी निवडून दिलेले खासदार आहेत. त्यामुळे अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांना भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करतो की सर्वपक्षीय बैठक सत्यात उतरवा, संसदेतील प्रत्येक खासदाराच्या पक्षाला आमंत्रण मिळालं पाहिजे”, असंही ते म्हणाले.