Air Chief Marshal AP Singh on why India ended conflict with Pakistan early Video : भारतीय हवाई दलाचे प्रमुख, एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांनी गुरुवारी ऑपरेशन सिंदूर आणि भारत पाकिस्तान संघर्षाबद्दल महत्त्वाचे विधान केले आहे. या वर्षी मे महिन्यात ‘ऑपरेशन सिंदूर’ झाल्यानंतर अनेक लोकांना भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष थांबू नये असे वाटत होते. मात्र, मुख्य उद्दिष्टे साध्य झाल्यामुळे ही कारवाई थांबवण्यात आली असे सिंग म्हणाले . यावेळी एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांनी असेही सुचवले की, युद्धामुळे अंहकार पोसला जायला नको आणि हे जगाने भारताकडून हे शिकले पाहिजे.

२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्या २६ जणांचा मृत्यू झाला. यानंतर भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना यशस्वीपणे लक्ष्य केले. ऑपरेशन सिंदूरमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात सशस्त्र संघर्ष पेटला, दोन्ही देशांनी अनेक दिवस एकमेकांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले केले. अखेर पाकिस्तानचे डीजीएमओ यांनी भारतातील लष्करी अधिकार्‍यांशी संपर्क साधला आणि हा संघर्ष थांबला.

शुक्रवारी एका कार्यक्रमात बोलताना, भारतीय हवाई दलाचे प्रमुख सिंग यांनी पाकिस्तानविरोधातील कारवाई ही अजून काही काळ चालली पाहिजे होते असा युक्तीवाद करणाऱ्या लोकांच्या चर्चेला पूर्णविराम दिला. भारताचे मुख्य उद्दिष्ट हे ‘दहशतवादाला विरोध’ हे असल्याने भारताने संघर्ष थांबवला, असे त्यांनी सांगितले.

एअर चीफ मार्शल एपी सिंग म्हणाले की संघर्ष सुरू ठेवण्याची एक किंमत मोजावी लागते, यासाठी त्यांनी जगात सध्या अनेक वर्षांपासून सुरू असलेले संघर्ष इस्रायल आणि रशिया-युक्रेन यांची उदाहरणे दिली.

संघर्ष का थांबवला?

हवाई दल प्रमुख म्हणाले की, “आज जे मुख्य युद्ध सुरू आहेत, मग ते रशिया-युक्रेन असो किंवा इस्रायलचे युद्ध… ते चालूच आहे, कित्येक वर्ष निघून गेले. कारण कोणी आपल्याला हे बंदही करायचे आहे याच विचारच करत नाहीये. मला वाटतं की आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की, आम्हालाही असे सांगण्यात आलं की अजून थोडं करायला पाहिजे होतं, आपण खूप लवकर युद्ध थांबवलं…. होय, ते बॅकफुटवर होते काही शंका नाही. पण आपले उद्दिष्टे काय होती. आपला उद्देश दहशतवाद विरोध होता, त्यांना लक्ष्य करणे हा होता. ते आपण केलं होतं. जर आपली उद्दिष्टे पूर्ण झाली आहेत, तर आपण संघर्ष का थांबवू नये? आपण का चालू ठेवावा?”

“कारण कोणताही संघर्ष असला तरी आपल्याला त्याची मोठी किंमत मोजावी लागते. त्याचा परिणाम आपल्या पुढील संघर्षासाठीच्या तयारीवर होईल. त्याचा आपल्या अर्थव्यवस्थेवर आणि आपल्या देशाच्या विकासावर परिणाम होईल,” असे सिंग म्हणाले.

“त्यामुळे मला वाटतं की जग हेच विसरत चालले आहे. त्यांना हेच माहिती नाही की युद्ध सुरू केलं तेव्हा आपलं लक्ष्य काय होत. त्यांची गोल पोस्ट शिफ्ट होत चालले आहेत. यामध्ये अहंकार मध्ये येत आहेत. आणि यामुळे मला वाटतं की कशा पद्धतीने शक्य तितक्या लवकर संघर्ष कसा सुरू करायचा आणि कसा संपवायचा याचा धडा जगाने भारताकडून घेतला पाहिजे ,” असे भारतीय हवाई दलाचे प्रमुख म्हणाले.