पीटीआय, नवी दिल्ली

लाल किल्ल्याजवळ कारमध्ये झालेल्या भीषण स्फोटाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बिहारमध्ये सध्या मंगळवारी ११ नोव्हेंबरला मतदानाचा अखेरचा टप्पा पार पडणार आहे. यामुळे राज्यात सर्वत्र अतिसतर्कता बाळगण्यात येत आहे, असे राज्याचे पोलिस महासंचालक विनय कुमार यांनी सांगितले.

याबाबत पोलिसांच्या सर्व शाखांना विशेष काळजी घेण्याची, परिस्थितीवर निरीक्षण आणि चोख बंदोबस्त ठेवण्याचा आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बोधगया मंदिर, विश्व शांती स्तूप, महावीर मंदिर, या पर्यटनस्थळांसह विमानतळ, तेल शुद्धीकरण प्रकल्प, औष्णिक उर्जा प्रकल्पांच्या ठिकाणीही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

हिमाचल प्रदेश पोलिसांनी नागरिकांना सतर्कता बाळगण्याची सूचना केली आहे. कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका वा त्या पसरवण्यास कारणीभूत होऊ नका, असे आवाहन राज्यातील नागरिकांना करण्यात आले आहे. तमीळनाडू पोलिसांनीही राज्यातील गर्दीच्या ठिकाणांवरील बदोबस्तात वाढ केली आहे. त्याचप्रमाणे चेकनाक्यावरील वाहनांची कसून तपासणी करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहे.