तेलगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी आज आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. दरम्यान, या सोहळ्यानंतर आता अमित शाह यांच्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत अमित शाह आणि माजी राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजन यांच्यातील संभाषण असून अमित शाह हे तमिलिसाई सौंदरराजन यांच्यावर संतापल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडिया या व्हिडीओची जोरदार चर्चा सुरू आहे.

हेही वाचा – “देशातील कायदा-सुव्यवस्थेला गृहमंत्र्यांपासून धोका”, संजय राऊतांचा अमित शाहांवर गंभीर आरोप; म्हणाले, “दुसऱ्यांदा…”

व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे?

शपथविधी सोहळ्यादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे व्यासपीठावर बसले असताना यावेळी माजी राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजनदेखील तिथे पोहोचल्या. यावेळी त्यांनी माजी उपराष्ट्रपती वैंकया नायडू आणि अमित शाह यांना अभिवादन केलं. त्या पुढे जाणार इतक्याच अमित शाह यांनी त्यांना बोलवून त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी अमित शाह तमिलिसाई सौंदरराजन रागात काही तरी सांगत असल्याचे दिसून आलं.

कार्तिक गोपीनाथ यांनी शेअर केला व्हिडीओ

दरम्यान, भाजपा राज्य सोशल मीडिया सेलचे उपाध्यक्ष कार्तिक गोपीनाथ यांनी एक्स या समाज माध्यमावर हा व्हिडीओ शेअर केला असून त्यांनी या व्हिडीओला ‘अमित शाह तमिलिसाई अक्का यांना कडक चेतावणी देत आहेत, असं वाटतं. पण सार्वजनिक इशारा देण्याचे कारण काय असू शकते?’ असं कॅप्शन दिलं आहे.

हेही वाचा – गडकरींकडील जुनं खातं कायम, नड्डांकडे आरोग्य, शिंदेंच्या मंत्र्याकडे ‘या’ खात्याचा स्वतंत्र कार्यभार; वाचा कुणाला कुठलं मंत्रिपद?

विशेष म्हणजे मागील काही दिवसापासून तमिलिसाई सौंदरराजन आणि तामिळनाडूचे राज्यप्रमुख अन्नामलाई यांच्या समर्थकांमध्ये वाद सुरू असल्याचे सांगितले जात आहे. अशातच आता हा व्हिडीओ आता व्हायरल झाल्याने सोशल मीडियावर विविध चर्चांनाही उधाण आलं आहे. महत्त्वाचे म्हणजे या व्हिडीओबाबत भाजपाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.