नवी दिल्ली : राज्य निवडणूक आयोगाने पाच दिवसांपूर्वी काढलेल्या अधिसूचनेमुळे दिल्लीमध्ये १६ एप्रिल रोजी लोकसभेसाठी मतदान होणार असल्याचा तर्क केला जात होता. मात्र, मंगळवारी आयोगाने, ही अंतिम तारीख नसल्याचे स्पष्टीकरण देऊन चर्चाना तूर्त विराम दिला असला तरी, आगामी लोकसभा निवडणूक तुलनेत लवकर होण्याची अटकळ बांधली जात आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने आढावा बैठक घेतली असली तरी अजून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. राज्या-राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकीची तयारी केली जात असून दिल्लीतील सर्व जिल्ह्यांतील निवडणूक अधिकाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगाने १९ जानेवारी रोजी पाठवलेल्या पत्रामध्ये दिल्लीतील मतदानाची तात्पुरती तारीख १६ एप्रिल असल्याचे नमूद केले आहे. या तारखेमुळे दिल्लीतील ७ जागांसाठी संबंधित तारखेलाच मतदान होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. या तर्कवितर्कावर मंगळवारी राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी ‘एक्स’वर स्पष्टीकरण देत ही तारीख फेटाळली. केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीची तयारी पूर्ण करण्यासाठी वेळापत्रक ठरवून दिले आहे. संसदेचे हंगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर आयोग तारखा निश्चित करू शकते.