arrested doctor Muzammil Shakils mother and brother on terror allegations : फरिदाबाद येथे टेरर मॉड्यूल चालवत असल्याच्या आरोपात अटक करण्यात आलेल्या काश्मीरी डॉक्टरच्या आईने माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिली असून आपल्याला त्याच्या कारवायांबद्दल कसलीच कल्पना नसल्याचे म्हटले आहे. फरीदाबाद मॉड्यूलचा कथित संबंध दिल्लीतील लाल किल्ला स्फोटाशी जोडला गेल्याचे समोर आल्यानंतर, त्या डॉक्टरच्या आईने मंगळवारी पत्रकारांशी बोलताना त्याच्या सुटकेची मागणी केली.
फरीदाबादच्या धौज गावात डॉ. मुझम्मिल शकिल याच्या भाड्याच्या घरातून ३६० किलो स्फोटक साहित्य आणि दारूगोळा जप्त करण्यात आल्यानंतर त्याला सोमवारी सकाळी अटक करण्यात आली. दरम्यान त्याची आई, नसीमा यांनी आता दावा केला आहे की मुझम्मिल खूप पूर्वीच घर सोडून गेला होता.
एनआयएशी बोलताना त्या म्हणाल्या की, “तो जवळपास चार वर्षांपूर्वी घर सोडून गेला आहे. तो दिल्लीत डॉक्टर म्हणून काम करतो आहे. या काळत त्याच्याबद्दल आमच्याकडे काहीही माहिती नाही, आम्हाला याबद्दल दुसऱ्यांकडून समजले. आम्ही त्याला भेटण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी आम्हाला भेटू दिले नाही. माझ्या दुसऱ्या मुलाला देखील अटक करण्यात आले आहे.”
त्या पुढे बोलताना म्हणाल्या की, “ते माझा मुलगा दिल्ली स्फोटात संशयित असल्याचे सांगत आहेत. मला त्याबद्दल काहीही माहिती नाही. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की माझ्या दोन्ही मुलांची सुटका व्हावी.”
डॉ. मुझम्मिल शकिल याच्या भावाची प्रतिक्रिया
दरम्यान त्याच्या भावाने पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, शकिल याच्यावर दहशतवादाचे आरोप आहे, पण त्यांच्या कुटुंबाचा याच्याशी काहीही संबंध नाही. “जून महिन्यात वडिलांच्या शस्त्रक्रियेच्यावेळी तो आम्हाला शेवटचा भेटायला आला होता. सर्वजण त्याच्यावर दहशतवादी असल्याचा आरोप करत आहेत, पण आमचा त्या गोष्टीशी काहीही संबंध नाहीये. माझ्या कुटुंबावर गेल्या ५० वर्षांत एकही गुन्हा दाखल झालेला नाही.” असे तो म्हणाला.
तो पुढे बोलताना म्हणाला की, “आम्ही पूर्णपणे भारतीय आहोत -आम्ही भारतासाठी दगडफेकीचा सामनाही केला आहे. तो खूप चांगला माणूस होता. ते आम्हाला त्याला भेटण्याची परवानगी देत नाहीयेत. माझ्या बहिणीची लग्न होते, ज्यामध्ये तो सहभागी होणार होता, ते आता रद्द करण्यात आले आहे.”
पोलिसांनी सोमवारी सांगितले की डॉ. मुझम्मिल शकिल याच्या निवासस्थानातून स्फोटके जप्त करण्यात आली आहेत, ज्याने धौज येथे जवळपास एक महिन्यापूर्वी घर भाड्याने घेतले होते. प्राथमिक अहवालात असे सांगितले जात होते की, रविवारी राबवलेल्या मोहिमेत आरडीएक्स सापडले आहे, मात्र नंतर पोलिसांनी ते अमोनियम नायट्रेट असल्याचे स्पष्ट केले.
डॉ. मुझम्मिल शकिल कोण आहे?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शकिल हा एक एमबीबीएस पदवी असलेला व्यक्ती असून त्याने भाड्याने घेतलेल्या धौज येथील घरात स्फोटके आणि शस्त्रास्त्रे सापडली आहेत.
पत्रकार परिषदेत माहिती देताना फरिदाबाद पोलीस आयुक्त सतेंदर कुमार गुप्ता यांनी सांगितले की, शकिल, ज्याच्या नावाचे स्पेलिंग रिपोर्ट्समध्ये वेगवेगळे आढळून आले आहे, हा धौज येथील अल फलाह विद्यापीठामध्ये शिकवत होता.
फरीदाबादचे सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) वरुण दहिया यांच्या म्हणण्यानुसार, शकिलने फतेहपूर टागा येथील घर सुमारे आठ महिन्यांपूर्वी भाड्याने घेतले होते.
दरम्यान धौज येथील रिकव्हरीनंतर फरीदाबादच्या फतेहपूर टागा गावातील एका घरातून जवळपास २५६३ किलोग्रॅम अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आले आहे.
