एककीडे लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा जवळ आलेला असताना दुसरीकडे उन्हाचा पारा प्रचंड वाढतोय ही स्थिती आहे. दिल्लीत सूर्य आग ओकतो आहे असं म्हटलं तर मुळीच वावगं ठरणार नाही कारण आज दिल्लीतलं तापमान ५२.३ अंश सेल्सियस इतकं प्रचंड नोंदवलं गेलं आहे. दिल्लीतलं हे आजवरचं उच्चांकी तापमान आहे. देशातलं सध्याच्या घडीचं सर्वात उच्चांकी तापमान दिल्लीत नोंदवलं गेलं आहे.

दिल्लीत आज सर्वात उष्ण दिवस

दिल्लीतल्या मुंगेशपूर हवामान केंद्राने दुपारी २.३० वाजता ५२.३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद केली आहे. दिल्लीतल्या या तापमानामुळे आजचा दिवस हा सर्वात उष्ण दिवस म्हणून नोंदवला गेला आहे. दुपारी ४ नंतर दिल्लीतल्या काही भागांमध्ये हलका पाऊसही झाला. एरवी महाराष्ट्रातल्या विदर्भात तापमान वाढण्याच्या आणि उष्ण दिवसाच्या बातम्या येत असतात. मात्र दिल्लीत रेकॉर्डब्रेक तापमानाची नोंद झाली आहे. आजचा दिवस हा दिल्लीतला सर्वात उष्ण दिवस म्हणून नोंदवला गेला आहे.

आज सकाळी दिल्लीत काय स्थिती होती?

दिल्ली, मध्य आणि वायव्य भारतातील अनेक भागांप्रमाणेच, मुंगेशपूर आणि नरेला येथील दोन स्वयंचलित हवामान केंद्रांवर कमाल तापमान ४९.९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. त्यानंतर दुपारी २.३० च्या सुमारास पारा ५२.३ अंशांवर पोहचला. त्या आधी आज सकाळी दिल्ली विद्यापीठाजवळील अया नगर आणि रिज येथील मॅन्युअल वेधशाळांनी अनुक्रमे ४७.६ अंश सेल्सिअस आणि ४७.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.

दिल्लीतल्या सफदरजंगच्या बेस स्टेशनवर कमाल तापमान ४५.८ अंश सेल्सिअसवर पोहोचले, जे या हंगामातील आतापर्यंतचे सर्वोच्च तापमान आहे. मे २०२० मध्ये सर्वोच्च तापमान ४६ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. तर, भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार बुधवारी कमाल तापमान ४६ अंश सेल्सिअसच्या आसपास राहणार असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र उन्हाचा पारा ५२.३ अंशांवर पोहचला.

हे पण वाचा- विदर्भात उन्हाचा कहर! रेल्वे स्थानकावर मात्र ‘मिस्ट कुलिंग’मुळे गारवा…

दिल्लीत रेड अलर्ट

दिल्लीत मे महिन्याच्या शेवटच्या दिवसात तापमानात मोठी वाढ झाली आहे. कडक उन्हामुळे शहरात पुढील दोन दिवस ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. IMD ने बुधवारच्या आपल्या अंदाजात म्हटले आहे की बुधवारी दिल्लीच्या अनेक भागांमध्ये तीव्र उष्णता जाणवू शकते आणि जोरदार वारेही वाहतील. मात्र, आकाश प्रामुख्याने निरभ्र राहील असंही सांगण्यात आलं होतं मात्र दिल्लीत काही भागांमध्ये हलका पाऊस झाला.

दिल्लीत भीषण पाणी टंचाई

एकीकडे तापमानाचा पारा वाढत असताना दिल्लीत जलसंकटही निर्माण झाले आहे. दिल्लीतील अनेक भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. १ मे पासून हरियाणाने दिल्लीच्या वाट्याचे पाणी सोडले नसल्याचा आरोपही मंत्र्यांनी केला आणि हा प्रश्न लवकर सोडवला नाही तर दिल्ली सर्वोच्च न्यायालयात जाईल. पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी शेजारी हरियाणा आणि उत्तर प्रदेशवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेल्या दिल्लीतील गंभीर जलसंकट उभं राहिलं असल्याने पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.