नासाच्या सोफिया वेधशाळेचा शोध
मंगळाच्या वातावरणात ऑक्सिजनचे अणू सापडले असून हा शोध पृथ्वीपासून ४५ हजार फूट उंचीवर फिरणाऱ्या नासाच्या सोफिया ( स्ट्रॅटोफेरिक ऑब्झव्र्हेटरी फॉर इनफ्रारेड अँस्ट्रॉनॉमी) या फिरत्या प्रयोगशाळेने लावला आहे. ही वेधशाळा विमानाला लावलेली आहे. त्यांच्या मदतीने पृथ्वीच्या वर ४५ हजार फूट उंचीवर निरीक्षणे नोंदवली जात आहेत. मंगळाच्या वातावरणात अगदी वरच्या थरात म्हणजे मेसोस्फिअरमध्ये ऑक्सिजनचे अणू आहेत असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. मंगळाच्या सुरुवातीच्या काळात वायू तेथून कसे निघून गेले याचा अंदाजही त्यावरून येत आहे. सायन्स अलर्टने दिलेल्या वृत्तानुसार गेली अनेक वष्रे मंगळ हा मानवी वस्तीस योग्य असल्याचे वैज्ञानिकांना वाटते. जर पृथ्वी वसाहतयोग्य राहिली नाही किंवा लोकसंख्याच प्रचंड वाढली किंवा कुठल्याही आपत्तीजनक परिस्थितीत मंगळ हा पर्याय असू शकतो. मंगळावर ऑक्सिजनचे अणू सापडणे ही निश्चितच वेगळी घटना आहे, दुर्दैवाने मंगळावरील वातावरणात असलेला निम्माच ऑक्सिजन वैज्ञानिकांना आतापर्यंत सापडला आहे. वातावरणातील बदलांमुळे तेथे ऑक्सिजनचे प्रमाण कमी असावे असे वैज्ञानिकांना वाटते आहे. मंगळाच्या वातावरणात ऑक्सिजन सापडण्याची ही पहिली वेळ नाही. व्हायकिंग व मरीनर यानांनी तेथील ऑक्सिजन १९७० मध्ये शोधला होता. पृथ्वीच्या वातावरणावरून मंगळावरील वातावरणात असलेल्या ऑक्सिजनचा अंदाज लावता येणे कठीण आहे असे सोफिया प्रकल्पातील वैज्ञानिक पामेला मारकम यांनी सांगितले. मंगळाच्या वातावरणातील आण्विक ऑक्सिजन मोजण्यास कठीण आहे त्यासाठी अवरक्त किरणांच्या विविध तरंगांचे निरीक्षण करावे लागते. सोफिया प्रयोगशाळेत स्पेक्ट्रोमीटर असल्याने ते शक्य आहे. पृथ्वीवरील निळे आकाश, भरपूर बाष्प व दाट वातावरण यामुळे मंगळावरचा ऑक्सिजन गेल्या ४० वर्षांत शोधता आला नव्हता. पृथ्वीच्या वातावरणातून मंगळाचे निरीक्षण करता येते त्या मदतीने मंगळारील ऑक्सिजन शोधता आला. यातील सोफिया प्रयोगशाळा म्हणजे एक भले मोठे बोइंग विमान आहे. त्याला शंभर इंच व्यासाची दुर्बीण लावलेली आहे. सोफिया विमान पृथ्वीच्या वर ४५००० फूट उंचीवर आहे त्यामुळे मधे कुठलेच अडथळे नसतात. सोफियाच्या मदतीने वैज्ञानिकांनी मंगळावरचे ऑक्सिजनचे अणू शोधण्यात यश मिळवले आहे. अगदी सुरुवातीला व्हायकिंग यानाने मंगळावर ऑक्सिजन शोधला होता. सोफिया दुर्बिणीच्या निरीक्षणांवरून गणिताच्या आधारे मंगळावरील ऑक्सिजन अणू शोधण्यात आले आहेत. नासाने अजून या शोधाचा तपशील जाहीर केलेला नाही पण तो जाहीर केल्यावर मंगळाच्या मेसोस्फिअरमध्ये नेमका किती ऑक्सिजन आहे हे समजू शकेल. मंगळावरील ऑक्सिजनची मापने यापुढेही सोफिया प्रयोगशाळा घेत राहणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 13th May 2016 रोजी प्रकाशित
मंगळाच्या वातावरणात ऑक्सिजनचे अणू
मंगळाच्या वातावरणात ऑक्सिजनचे अणू सापडले असून हा शोध पृथ्वीपासून ४५ हजार फूट उंचीवर

First published on: 13-05-2016 at 01:52 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atomic oxygen on mars detected by flying telescope