Bajrang Dal member arrested for abusing Blinkit staff: श्रावण महिना सुरू झाला असून या महिन्यात बरेच जण नॉनव्हेज खाणे टाळतात. यादरम्यान उत्तर प्रदेशात एक गंभीर प्रकार समोर आला आहे. श्रावण महिन्यात चिकन डिलिव्हरी केल्याबद्दल ब्लिंकिटच्या सहाय्यक व्यवस्थापकाला अपमान करत त्याला धमकावल्याप्रकरणी बजरंग दलाच्या एका सदस्याला अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथे गुरूवारी ही घटना घडली असे पोलिसांनी सांगितले.

गाझियाबाद (शहर) पोलीस उपायुक्त धावल जैस्वास यांनी आरोपीचे नाव मनोज वर्मा असे असल्याची माहिती दिली आहे. “आम्ही या घटनेचा तपास सुरू केला आहे,” असेही त्यांनी सांगितले, तसेच न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

विजय नगरचे सहाय्यक पोलिस आयुक्त रितेश त्रिपाठी म्हणाले की, ब्लिंकिटचे सहाय्यक व्यवस्थापक मोनिश यांनी बुधवारी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर वर्मा यांना अटक करण्यात आली.

वर्मा त्याच्या काही साथिदारांसह १५ जुलै रोजी विजय नगरमधील सिद्धार्थ विहार येथील ब्लिंकिट स्टोअरमध्ये आला होता, असे मोनिश यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. “तो दुपारी ४ ते ५ च्या दरम्यान आला आणि श्रावण महिन्यात चिकनची डिलीव्हरी करत असल्याचे सांगून त्याने फ्लीट मॅनेजर अभयला शिवीगाळ सुरू केली,” असे मोनिश यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच अभययने हे थांबवले नाही तर वर्मा त्याचा जीव घेईल आणि स्टोअर बंद पाडेल अशी धमकी दिल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

“आज मंगळवार आहे आणि श्रावणही..”

वर्मा याच्या विरोधात तक्रार दाखल होण्यापूर्वीचा एक व्हिडीओ देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये वर्मा आणि इतर काही जण बाईकवर असलेल्या एका ब्लिंकीट डिलीव्हरी एजंट रितू राज याला रोखताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये वर्मा हा डिलीव्हरी एजंट राज याला त्याचे पार्सल दाखवण्यास सांगताना दिसत आहेत. त्याच्याकडे कच्चे चिकन आढळून आल्यानंतर वर्माने राज याला त्याच्या ग्राहकाला फोन करायला लावला. जेव्हा ग्राहक फोन उचलतो तेव्हा वर्मा फोनवर त्याला म्हणताना ऐकू येत आहे की, “आज मंगळवार आहे आणि श्रावणही आहे. आम्ही कमीत कमी मांसाहारी पदार्थ विकले जातील यासाठी प्रयत्न करत आहोत.आम्ही बजरंग दलाचे कार्यकर्ते आहोत आणि हे आमचे काम आहे…” पण जेव्हा ग्राहक जेव्हा त्या ती ख्रिश्चन असल्याचे सांगते तेव्हा वर्मा राजला जाऊ देतो.