Beant Singh Assassination Case Supreme Court : पंजाबचे दिवंगत मुख्यमंत्री बेअंत सिंग यांच्या हत्या प्रकरणात दोषी ठरलेल्या बलवंत सिंग राजोआनाच्या दया याचिकेवर निर्णय घेण्यास झालेल्या अवाजवी विलंबाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय खंडपीठाने याप्रकरणी केंद्र सरकारला विचारलं की “बलवंत सिंगला आतापर्यंत फाशी का नाही दिली? यासाठी कोण जबाबदार आहे?” न्यायमूर्ती उपरोधिकपणे म्हणाले की “आम्हाला वाटतं की कमीत कमी आम्ही त्याच्या फाशीवर स्थगिती तर दिलेली नाही.”

न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की “आम्ही या शिक्षेस स्थगिती देणार नाही. त्यामुळे पुढच्या सुनावणीवेळी कार्यवाही अपेक्षित आहे.” २५ नोव्हेंबर २०२४ रोजी याप्रकरणी झालेल्या सुनावणीवेळी केंद्र सरकारने म्हटलं होतं की मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या बलवंत सिंग राजोआनाच्या दया याचिकेवर निर्णय घेण्याचा मुद्दा संवेदनशील आहे. बेअंत सिंग यांच्या हत्याप्रकरणात बंदी घालण्यात आलेली संघटना खालसाचा सदस्य राजोआनाला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र, सरकार व तुरुंग प्रशासनाने या शिक्षेची अंमलबजावणी केलेली नाही. त्यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.

गेल्या वर्षी १८ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सचिवांना आदेश दिला होता की बलवंत सिंग राजोआनाची दया याचिका तातडीने राष्ट्रपतींसमोर सादर करा. तसेच या प्रकरणी दोन आठवड्यांमध्ये निर्णय घेण्याची त्यांना विनंती करा. मात्र, महाधिवक्त्यांच्या विनंतीनंतर सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशांवर स्थगिती दिली होती.

राजोआनाला फाशीऐवजी जन्मठेप मिळावी यासाठी वकिलांचे प्रयत्न

महाधिवक्ते मुकूल रोहतगी यांनी म्हटलं होतं की त्याच हल्ल्यात (मुख्यमंत्र्यांवरील हल्ला) इतरही काहीजण सहभागी होते, देवेंद्र भुल्लर हा त्यापैकी एक होता. भुल्लरला सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली होती. तसेच त्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती. त्यानंतर एका क्युरेटिव्ह याचिकेत भुल्लरची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली.

मुकूल रोहतगी म्हणाले, “मला माहिती नाही माझ्या आशिलाचं काय होणार आहे. परंतु, शिक्षेत बदल झाला तर ३० वर्षांनंतर त्याला तुरुंगातून मुक्त करावं लागेल.” यावर न्यायमूर्ती म्हणाले, “आम्हाला पंजाबच्या नियमांची कल्पना नाही.” त्यानंतर रोहतगी म्हणाले, “याच हत्याप्रकरणात सहभागी असलेले काहीजण आधीपासूनच तुरुंगाबाहेर आहेत.”