Bengaluru Crime News: अभ्यासात मदत करण्याचे आमिष दाखवून शहरात बोलावून घेतलेल्या एका विद्यार्थिनीवर बलात्कार आणि ब्लॅकमेलिंग केल्याच्या आरोपाखाली बंगळुरूमध्ये दोन महाविद्यालयीन लेक्चरर्स आणि त्यांच्या मित्राला अटक करण्यात आली आहे. पीडितेने कर्नाटक राज्य महिला आयोगाकडे तक्रार केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. याबाबत इंडिया टुडेने वृत्त दिले आहे.
दरम्यान या प्रकरणातील आरोपींची ओळख पटली असून, यातील नरेंद्र हा फिजिक्सचा लेक्चरर असून संदीप बायोलॉजी शिकवतो. याचबरोबर तिसरा आरोपी अनुप हा या दोघांचा जवळचा मित्र आहे. हे तिघेही जण बेंगळुरूमधील एका खाजगी महाविद्यालयाशी संलग्न आहेत, इंडिया टुडेच्या बातमीत म्हटले आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्रने विद्यार्थिनीला शैक्षणिक नोट्स देण्याचे आश्वासन देऊन बेंगळुरूला बोलावले तेव्हा अत्याचाराला सुरुवात झाली. तो तिला एका मित्राच्या घरी घेऊन गेला, जिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. तर संदीपने विद्यार्थिनीला ब्लॅकमेल करण्यासाठी आणि पुन्हा तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यासाठी लैंगिक शोषणाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे तिच्यावर सातत्याने अत्याचार झाल्याचे, वृत्तात पुढे म्हटले आहे.
दरम्यान दोन्ही आरोपी लेक्चरर्सचा जवळचा मित्र असलेला अनुप विद्यार्थिनीला तिच्या भेटीचे कथित सीसीटीव्ही फुटेज दाखवून धमकावण्याचा आणि तिच्यावर बलात्कार करायचा असा आरोप आहे.
या घटना एक महिन्यापूर्वी घडल्या असल्या तरी, पीडितेने अलिकडेच तिच्या पालकांना याबाबत माहिती दिल्यानंतर महिला आयोगाकडे औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली, ज्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली.
बंगळुरू पूर्वचे सह पोलीस आयुक्त रमेश बनोथ म्हणाले की, “५ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पीडितेच्या तक्रारीच्या आधारे, आम्ही तीन जणांना अटक केली आहे”, असेही इंडिया टुडेच्या वृत्तात म्हटले आहे.
अटक केल्यानंतर दोन्ही लेक्चरर्स आणि त्यांचा मित्र अनुप यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.