Social Media Post on Corruption: भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) कंपनीच्या वरिष्ठ पदावरून निवृत्त झालेल्या एका व्यक्तीने मुलीच्या मृत्यूनंतर त्याला आलेल्या अनुभवांची एक हृदयद्रावक पोस्ट शेअर केली. या पोस्टनंतर बंगळुरूमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर पोलिसांनी एक पीएसआय आणि शिपायाचे निलंबन केले आहे. मुलीचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णालयापासून ते मृत्यूपत्र मिळवण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर मुलीच्या वडिलांना पैसे चारावे लागले. याबद्दल तीव्र खेद व्यक्त करणारी पोस्ट त्यांनी शेअर केली होती.

के. शिवकुमार हे बीपीसीएलमध्ये सीएफओ या पदावरून निवृत्त झाले. त्यांनी लिंक्डइनवर एक भावनिक पोस्ट लिहिली. ३४ वर्षीय मुलगी अक्षयाच्या मृत्यूनंतर त्यांना औपचारिकता पूर्ण करताना प्रत्येक टप्प्यावर भ्रष्टाचाराचा सामना करावा लागला. यामुळे खिन्न झालेल्या शिवकुमार यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून आपला रोष व्यक्त केला.

अक्षयाने गोल्डमन सॅक्समध्ये आठ वर्ष काम केले होते. १८ सप्टेंबर २०२५ रोजी तिचा ब्रेन हॅमरेजमुळे घरातच मृत्यू झाला. तिने कम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक आणि आयआयएम अहमदाबादमधून एमबीए केले होते.

अक्षयाच्या मृत्यूनंतर केलेली पोस्ट शिवकुमार यांनी कालांतराने डिलीट केली. कारण या पोस्टवर हजारो लोकांनी आपल्या तीव्र प्रतिक्रिया नोंदविल्या होत्या. त्यांनी लिहिले होते की, मुलीच्या मृत्यूनंतर रुग्णवाहिका चालक, पोलीस अधिकारी, स्मशानभूमी, बंगळुरू महानगर पालिकेतील कर्मचारी अशा प्रत्येक टप्प्यावरील लोकांना त्यांना पैसे द्यावे लागले.

शिवकुमार यांनी पोस्टमध्ये लिहिले, माझ्या एकुलत्या एक मुलीचे वयाच्या ३४ व्या वर्षी निधन झाले. रुग्णवाहिकेकडून उघडपणे लाच मागितली गेली. एफआयआर आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टसाठी पोलीस, पावती देण्यासाठी स्मशानभूमी, मृत्यू प्रमाणपत्रासाठी महानगरपालिका कार्यालयाने माझ्याकडून लाच मागितली.

जे गरीब आहेत त्यांचे काय?

“पोलीस ठाण्यात मला रोख रक्कम देण्यास भाग पाडले गेले. पोलिसांनी पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि एफआयआर कॉपी देणे भाग होते. चार दिवसांनी जेव्हा मी त्यांना भेटलो, तेव्हा त्यांनी उघडपणे पैशांची मागणी केली. भर पोलीस ठाण्यात मी त्यांना पैसे दिले. मुलगी गमावलेल्या वडिलांप्रतीही त्यांना काहीच सहानुभूती वाटत नाही. ही खूपच दुःखद परिस्थिती आहे. माझ्याकडे पैसे होते म्हणून दिले. जो गरीब आहे, त्याची काय परिस्थिती असेल?”, अशी खंत शिवकुमार यांनी व्यक्त केली.

रुग्णवाहिका चालकाने मुलीचा मृतदेह एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात नेण्यासाठी ३००० रुपये मागितले. तसेच पोलिसांनी जराही माणुसकी दाखवली नाही. पोलिसांना कुटुंब आहे की नाही? असा प्रश्न पडतो. पैसे मागून वर ते अरेरावीने बोलत होते. माझे हाल इथेच थांबले नाहीत. जेव्हा मृत्यूपत्र घेण्यासाठी महानगरपालिकेच्या कार्यालयात गेलो, तेव्हा तिथे कुणीही कर्मचारी उपस्थित नव्हते. पाच दिवसांनी जेव्हा मी अतिरिक्त पैसे दिले, तेव्हा कुठे मला मृत्यू प्रमाणपत्र देण्यात आले.

नारायण मूर्ती, अझीम प्रेमजी यांना आवाहन

पोस्टच्या शेवटी शिवकुमार यांनी बंगळुरूमधील प्रसिद्ध उद्योगपती नारायण मूर्ती, अझीम प्रेमजी, मजुमदार यांना आवाहन करत म्हटले की, तुम्ही अब्जाधीश आहात. तुम्ही तरी हे शहर वाचवू शकतात का?

दोन पोलिसांचे निलंबन

शिवकुमार यांची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला. रोष वाढू लागल्यानंतर बंगळुरू पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. बेलांदूर पोलीस ठाण्यातील एक पोलीस उपनिरीक्षक आणि शिपायाचे तात्काल निलंबन करण्यात आले. पोलीस प्रमुखांनी सांगितले की, आम्ही अशाप्रकारचा गैरव्यवहार अजिबात खपवून घेणार नाही.

दरम्यान ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर भाजपाकडून काँग्रेस सरकारवर टीका होत आहे. भाजपाच्या नेत्या मालविका अविनाश यांनी शिवकुमार यांच्याप्रती सहानुभूती व्यक्त करत काँग्रेसवर टीका केली.