Bengaluru : बंगळुरूमधील एका उद्योजकाने त्याच्या रेस्टॉरंटला अचानक भेट दिली आणि त्यांना धक्काच बसला. या उद्योजकाने स्वत:च्या रेस्टॉरंटच्या स्वयंपाकघरात अचानक जाऊन तपासणी केली आणि तत्काळ तीन कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं. या संदर्भात द पिझ्झा बेकरीचे सह-संस्थापक अभिजित गुप्ता यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

त्या व्हिडीओमध्ये गुप्ता यांनी सांगितलं की एखाद्या व्यवसायात गुणवत्ता आणि शिस्त राखण्यासाठी अशा अचानक तपासण्या करणं किती महत्वाचं आहे, याबाबत सविस्तर भूमिका मांडली आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे. गुप्ता यांनी म्हटलं की, “अचानक तपासणी किंवा भेट व्यवसायाची वास्तविकता दाखवतात. कागदावर तुम्ही जे पाहता आणि प्रत्यक्षात जे आहे ते या दोन खूप वेगळ्या गोष्टी असू शकतात. या तपासणीमुळेच आमची प्रणाली मजबूत राहते”, असं त्यांनी म्हटलं.

दरम्यान, व्हिडिओमध्ये गुप्ता हे बंगळुरूमधील त्यांच्या रेस्टॉरंटच्या स्वयंपाकघराला भेट देतात. पहिल्यांदा जिथे एका रेस्टॉरंटच्या स्वयंपाकघराची पाहणी करतात आणि सर्व टीमच्या कामगिरीचं कौतुक करतात. त्यानंतर गुप्ता हे त्यांच्या सहकारनगरमधील दुसऱ्या एका शाखेला अचानक भेट देतात आणि ग्राहकांच्या तक्रारीची वैयक्तिकरित्या पडताळणी करतात.

तेव्हा ते पिझ्झाच्या अभिप्रायाचा संदर्भ देत म्हणतात की “एका ग्राहकाने सांगितलं की ब्रोकोलीमध्ये कोणताही स्वाद किंवा मॅरीनेशन नव्हतं. त्यानंतर ते तो पिझ्झा खातात आणि ग्राहकाची तक्रार योग्य असल्याचं मान्य असल्याचं म्हणतात. “ग्राहकांचं म्हणणं बरोबर आहे, ब्रोकोलीमध्ये पुरेसा मसाला आणि इतर गोष्टी नव्हत्या म्हणून आम्ही यावर काम करू. तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद”, असं म्हणतात. त्यानंतर गुप्ता त्यांच्या मॅनेजरला विचारता की, “तुम्ही आज किती लोकांना कामावरून काढून टाकलं?” त्यावर मॅनेजर म्हणतात की, “तीन लोकांना.”

कर्मचाऱ्यांना का काढून टाकलं?

दरम्यान, व्हिडीओच्या शेवटी गुप्ता यांनी कामगारांना काढून टाकण्याचं कारण स्पष्ट केलं. ते म्हणतात की “आमचे मॅनेजर ३ किंवा ४ कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याबद्दल बोलत होते. आमच्याकडे शून्य अल्कोहोल पॉलिसी आहे. तुम्ही गांजा किंवा अल्कोहोलचं सेवन करून काम करण्यासाठी येऊ शकत नाही. दुर्दैवाने आम्हाला उर्वरित टीमसाठी एक उदाहरण मांडण्यासाठी या लोकांना कामावरून काढून टाकावं लागलं, हे दुःखद आहे. खरं तर आम्हाला लोकांना कामावरून काढून टाकणं आवडत नाही. परंतु ते करायला हवं होतं”, असं त्यांनी म्हटलं आहे.