Bengaluru road rage Case Video : बंगळूरूमध्ये स्त्यावर झालेल्या अपघातानंतर एका २४ वर्षीय फूड डिलिव्हरी एजंटची कथितरित्या हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एका कलरिपायट्टू (Kalaripayattu) मार्शल आर्ट्स ट्रेनर आणि त्याच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
नटराज लेआऊट येथे २५ ऑक्टोबरच्या रात्री ही घटना घडली. यामुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून यामध्ये जोडपे पीडित व्यक्तीच्या स्कूटरला मुद्दाम मागून धडक देताना पाहायला मिळत आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली असून त्याचे नाव मनोज कुमार (३२ ) असे आहे आणि ते मूळचा केरळचा रहिवासी असून त्याची पत्नी आरती शर्मा (३०) ही जम्मू आणि काश्मीरची रहिवासी आहे. या दोघांचे पाच वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. या दोघांना अठक करण्यात आली आहे. मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार त्यांची कार पीडित व्यक्तीचा पाठलाग करताना आणि त्याला धडक देताना दिसून येत आहे.
या घटनेतील पीडिताचे ना दर्शन (२४) असून तो केंबत्तल्ली येथील फूड डिलिव्हरी एजंट होता, त्याच्या गिअरलेस स्कूटरला कारने मागून जोरदार धडक दिल्यानंतर त्याचा जागीच मृत्यू झाला. तर स्कूटरवर मागे बसलेला त्याचा मित्र वरुण हा गंभीर जखमी झाला आहे. अविवाहित असलेल्या दर्शनच्या पश्चात त्याच्या कुटुंबात आई-वडील आणि बहीण आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री ९ च्या सुमारास घडली जेव्हा दर्शनचे स्कूटर चुकीने कुमार याच्या कारच्या उजव्या बाजूच्या रीअर-व्ह्यू मिररला हलकेसे घासले, असे या रिपोर्टमध्ये पुढे म्हटले आहे. यानंतर दर्शनाने माफी मागितली आणि त्याची ऑर्डर देण्यासाठी पुढे निघून गेला, मात्र संतप्त झालेल्या कुमारने लगेच यू-टर्न घेतला, स्कूटरचा पाठलाग केला आणि काही मिनिटांतच मागून स्कूटरला धडक दिली व त्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला.
जखमी झालेल्या दर्शन आणि त्याच्या मित्राला स्थानिकांनी मदत केली आणि जवळच्या रुग्णालयात दाखल केले, पण डॉक्टरांनी दर्शनचा आधीच मृत्यू झाल्याचे सांगितले. सुरुवातीला, दर्शनच्या बहिणीला हा प्रकार जाणूनबुजून केल्याचे माहिती नसल्याने तिने जेपी नगर वाहतूक पोलिसांकडे हिट-अँड-रनची तक्रार दाखल केली होती.
मात्र या भागातील सीसीटीव्ही फुटेज मिळवले असता या प्रकरणाच्या तपासाला वेगळेच वळण मिळाले. हे प्रकरण त्यानंतर पुट्टेनाहळ्ळी पोलिसांना सोपवण्यात आले, ज्यांनी हत्येचा गुन्हा नोंद केला. विशेष बाब म्हणजे पोलिसांना तपासात आढळून आले की, हे जोडपे त्यांच्या वाहनाचे धडकेनंतर तुटलेले पार्ट गोळा करण्यासाठी रात्री ९ वाजून ४० मिनिटांनी मास्क घालून पुन्हा घटनास्थळी परत आले. त्याच सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पुन्हा त्यांच्या हलचाली आणि चेहरे कैद झाले, ज्यामुळे त्यांची ओळख पटली आणि नंतर त्यांना अटक करण्यात आली.
पोलीस उपायुक्त (दक्षिण) लोकेश जगलासर यांनी दोघांना अटक केल्याची पुष्टी केली. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, त्यांनी सांगितले की, मनोज आणि आरती या दोघांनीही या गुन्ह्यात आपला सहभाग कबूल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की मनोज हा एक प्रशिक्षित कलरिपायट्टू प्रशिक्षक असून तो आणि आरती हे गेल्या अनेक वर्षांपासून बंगळुरूमध्ये राहात आहेत.
