H-1B Visa Fee Exemptions: अमेरिकेतील हजारो भारतीय व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देत ट्रम्प प्रशासनाने एकाअर्थी दिवाळीची भेट दिली आहे. मागच्या महिन्यात डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने एच-१बी व्हिसावरील शुल्क १ लाख अमेरिकी डॉलर्स एवढे वाढवले होते. हा निर्णय भारतासाठी मोठा धक्का असल्याचे मानले गेले. भारतातून अनेक विद्यार्थी आणि तंत्रज्ञ अमेरिकेत शिक्षण आणि नोकरीसाठी जात असतात. आता ट्रम्प प्रशासनाने नियमात सुस्पष्टता आणली असून आधीपासूनच अमेरिकेत असलेल्या पदवीधरांना हे शुल्क भरावे लागणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
ज्यांच्याकडे आधीपासूनच एच-१बी व्हिसा आहे त्यांना मागच्या महिन्यात जाहीर करण्यात आलेले भरमसाठ शुल्क भरण्याची गरज नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. व्हिसासाठीचे पैसे कुणी भरायचे आहेत? कसे भरायचे? आणि नेमके हे शुल्क कुणाकुणाला माफ केले आह? याची सर्व माहिती यूएससीआयएस पोर्टलवर देण्यात आली आहे.
ट्रम्प यांनी सप्टेंबरमध्ये व्हिसा शुल्कात वाढ केल्यानंतर अनेक आठवडे गोंधळ उडाला होता. तांत्रिकदृष्ट्या कुशल विदेशी कर्मचाऱ्यांना कामावर घेणाऱ्या कंपन्यांना वर्षाला एक लाख डॉलर अर्थात भारतीय चलनात ९० लाख रुपये शुल्क भरावे लागणार होते. हे शुल्क २१ सप्टेंबरच्या मध्यरात्री लागू करण्यात आले. ज्यामुळे भारतीय कर्मचारी, अमेरिकन कंपन्या आणि इमिग्रेशन वकिलांमध्ये घबराट पसरली.
विद्यमान व्हिसा धारकांना दिलासा
यूएस सिटीझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस (USCIS) ने ताज्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे की, अमेरिकेत आधीच वैध व्हिसावर असलेल्या कुणालाही नवे शुल्क लागू होणार नाही. यामध्ये एफ-१ विद्यार्थी व्हिसा धारक, एल-१ कंपनी अंतर्गत हस्तांतरण झालेले, नूतनीकरण आणि मुदतवाढ मिळवू इच्छिणारे सध्याचे एच-१बी व्हिसा धारक यांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांना सूट
USCIS च्या नवीन सूचनांनुसार, एफ-१ विद्यार्थी व्हिसाधारकांना आणि एल-१ अंतर्गत येणाऱ्या व्यावसायिकांना एच-१बी व्हिसासाठी लागू केलेले शुल्क भरावे लागणार नाही. एफ-१ व्हिसाच्या माध्यमातून अमेरिकेतील कॉलेज, विद्यापीठ, प्राथमिक शाळा किंवा इतर शैक्षणिक संस्थेत, भाषा प्रशिक्षण कार्यक्रमात पूर्णवेळ विद्यार्थी म्हणून प्रवेश करण्याची परवानगी दिली जाते. पदवी, डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अमेरिकन सरकारने मान्यता दिलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळवणे बंधनकारक असते.
त्याचप्रमाणे आता एच-१बी व्हिसा असलेला कोणताही व्यक्ती, विदेशी लाभार्थी अमेरिका किंवा अमेरिकेबाहेर प्रवास करू शकतो.
एच-१बी व्हिसाचा सर्वाधिक वापर भारतीयांकडून
अमेरिकेने १९९० साली एच-१बी व्हिसा कार्यक्रम सुरू केला. यामुळे जगभरातील कुशल मनुष्यबळ अमेरिकेला मिळाले आणि त्यांनी तेथील तंत्रज्ञान क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. टेस्ला, स्पेसएक्स या कंपन्यांचे संस्थापक एलॉन मस्क हेदेखील एच-१बी व्हिसाचे लाभार्थी आहेत. एच-१बी व्हिसाचा सर्वाधिक वापर भारतीय कर्मचाऱ्यांनी केला. मागच्या काही वर्षांतील आकडेवारीनुसार अमेरिकेकडून दरवर्षी ८५ हजार व्हिसासाठी लॉटरी काढली जाते. यात ७० टक्के वाटा एकट्या भारताचा असतो.