एक्सप्रेस वृत्त

पाटणा, नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी अर्ज भरण्याची मुदत शुक्रवारी संपली तरी विरोधी पक्षांच्या महागठबंधनला जागावाटप जाहीर करण्यात यश मिळाले नाही. उमेदवारीवरून पक्षांमध्ये गोंधळ आणि अंतर्गत संघर्षामुळे जागावाटप करण्यात आले नाही. त्यामुळे घटक पक्षांनी आपापले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.

पहिल्या टप्प्यात १२१ जागांसाठी मतदान होणार आहे. जागावाटपाबाबत अजूनही गोंधळ असून महाआघाडीतील सहकारी पक्षांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. गोंधळ संपवण्यासाठी चर्चा सुरूच आहे. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित १२२ जागांसाठी उमेदवारी दाखल करण्याची शेवटची तारीख सोमवार आहे. दोन दिवसांत जागावाटपाबाबत यशस्वी चर्चा करण्याचे महागठबंधनच्या घटक पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत.

राजद, काँग्रेस, माकप, भाकप, भाकप (एमएल-एल) आणि विकासशील इन्सान पार्टी (व्हीआयपी) यांचा समावेश असलेल्या महागठबंधनला अजूनही डझनभर मतदारसंघांमधील जागांसाठीचा संघर्ष सोडवायचा आहे. मात्र बहुतेक पक्षांनी एकतर्फी निर्णय घेत त्यांच्या यादी जाहीर केल्या. राजद आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी वैशाली आणि लालगंज मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले आहेत. काँग्रेसने वैशालीमधून संजीव सिंह यांना उमेदवारी दिली, तर राजदने त्याच जागेसाठी अभय कुशवाहा यांना उमेदवारी दिली. लालगंजमध्ये काँग्रेसने आदित्य राज यांना उमेदवारी दिली, तर राजदने लालगंजचे माजी आमदार मुन्ना शुक्ला यांची मुलगी शिवानी सिंह यांना उमेदवारी देण्यास सांगितले.

काँग्रेसने एकतर्फी ४८ उमेदवारांची यादी जाहीर केली होती, पण त्यांनी आणखी पाच जागांसाठी उमेदवारी मागितली. कहलगाव मतदारसंघासाठी काँग्रेसने उमेदवारी मागितली असली तरी राजद या मतदारसंघावरील दावा सोडण्यास तयार नाही. भाकपने (एमएल-लिबरेशन) पहिल्या टप्प्यासाठी एकतर्फी १४ उमेदवारांची घोषणा केली आहे. व्हीआयपी पक्षाचे नेते मुकेश सहानी यांनी उममुख्यमंत्री पदावर दावा सांगितला असून त्यांना आतापर्यंत १४ जागा मिळाल्या आहेत.