राष्ट्रीय जनता दल पक्षातील आणि नितीश कुमार यांच्या जेडीयूतील नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांचं सत्र चालूच आहे. बिहारमधील शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांनी पुन्हा एकदा राम मंदिराबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यासह त्यांनी त्यांच्या पक्षातील आमदार फतेह बहादूर सिंह यांच्या वादग्रस्त वक्तव्याचं समर्थन केलं आहे. आमदार फतेह बहादूर सिंह यांनी रविवारी (७ जानेवारी) राम मंदिरावर आक्षेपार्ह मत मांडलं होतं. ते म्हणाले होते, “अयोध्येत आता रामाचं मंदिर बांधलं जात आहे. या मंदिरातून केवळ ढोंगी आणि मनुवादी समाजाचा विकास होऊ शकतो.” दरम्यान, फतेह बहादूर सिंह यांच्यावर टीका होत असताना बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांनी फतेह बहादूर यांची पाठराखण केली आहे.
राम मंदिराद्वारे कोणाला रोजगार मिळणार आहे का? असा प्रश्न फतेह बहादूर यांनी उपस्थित केला होता. तसेच अयोध्येचं अस्तित्व नाकारत ते म्हणाले, “ती जागा साकेत होती. अयोध्या अजिबात नव्हती. साकेत ही गौतम बुद्ध आणि सम्राट अशोकाची भूमी आहे. साकेतच्या जमिनीवर विद्यापीठे, महाविद्यालये, रुग्णालये बांधायला हवी होती.” यासह फतेह बाहदूर यांनी देवी-देवतांवर काही आक्षेपार्ह वक्तव्ये केली होती.
दरम्यान, फतेह बहादूर यांच्या समर्थनात मैदानात उतरलेल्या मंत्री चंद्रशेखर यांनी अजून काही वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. तसेच फतेह बाहदूर यांच्यावर टीका करणाऱ्यांनाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं. चंद्रशेखर म्हणाले, आपण आज हिंदुत्वापासून सावध राहण्याची आवश्यकता आहे. मंदिराचा मार्ग हा मानसिक गुलामगिरीचा मार्ग आहे आणि शाळेचा मार्ग हा प्रकाशाचा मार्ग आहे. फतेह बहादूर यांच्या जीभेची आणि गळ्याची किंमत सांगणाऱ्यांनी एक लक्षात ठेवावं की, आता ते एकलव्याप्रमाणे बलिदान देणार नाहीत, तर बलिदान घेतील.
हे ही वाचा >> Bilkis Bano Case: सर्वोच्च न्यायालयाचा गुजरात सरकारला दणका; आरोपींची शिक्षा माफ करण्याचा निर्णय अखेर रद्द!
मंत्री चंद्रशेखर उपस्थितांना उद्देशून म्हणाले, तुम्हाला दुखापत झाली तर तुम्ही मंदिरात जाणार की रुग्णालयात? त्याचप्रमाणे आपल्याला ज्ञान मिळवायचं असेल, शिक्षण घेऊन मोठा अधिकारी व्हायचं असेल तर विद्यालयात जावं लागेल. त्यासाठी मंदिरात जाऊन चालणार नाही. खरंतर मंदिरांमध्ये शोषण होतं. राम हा तुमच्यात, माझ्यात आणि प्रत्येकात आहे, मग आपण त्याला शोधायला कुठे जाणार? देवाची स्थळं म्हणून ज्या जागा ठरवण्यात आल्या आहेत तिथे केवळ शोषण होतं. या स्थळांद्वारे कुठल्या ना कुठल्यातरी समाजातील काही ठराविक लोक षडयंत्र रचून स्वतःचे खिसे भरण्याचं काम करतात.