Gopalganj Cyber Fraud Bust: बिहारमध्ये पुढील महिन्यात विधानसभेसाठी मतदान होणार आहे. यासाठी बिहार पोलिसांकडून राज्यात निवडणूक आयोग आणि पोलिसांची भरारी पथके बेहिशेबी पैशांच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. या दरम्यान बिहारच्या गोपालगंज येथे एका चहावाल्याच्या घरातून पोलिसांच्या हाती मोठं घबाड लागलं. हा चहावाला सायबर गुन्ह्यांचे रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसे पुरावे त्याच्या घरातून जप्त करण्यात आले आहेत.
झारखंडमधील जामतारा जिल्हा काही काळापूर्वी सायबर गुन्हेगारीच्या बाबतीत चर्चेत आला होता. नेटफ्लिक्सवर ‘जामतारा, सबका नंबर आयेगा’ या नावाने वेबसीरीज प्रदर्शित झाली आहे. या वेबसीरीजची आठवण होईल, अशी घटना गोपालगंजमध्ये घडली. गूप्त माहिती मिळाल्यानंतर अमेठी खूर्द गावात पोलिसांनी धाड टाकली असता त्यांना चहावाल्याच्या घरात १ कोटींची रोकड, ३४४ ग्राम सोन्याचे दागिने, १.७५ किलो चांदी आणि सायबर गुन्ह्याशी संबंधित असलेल्या वस्तू मिळाल्या.
सायबर विभागाच्या पोलीस उपायुक्त अवंतिका दिलीप कुमार यांनी या घटनेची माहिती दिली. त्या म्हणाल्या, जप्त केलेल्या वस्तूंमध्ये ८५ एटीएम कार्ड, ७५ बँक खात्याचे पासबुक, २८ चेकबुक, आधार कार्ड, दोन लॅपटॉप आणि तीन मोबाइल फोन तसेच काही आलिशान गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
चहा विक्रेता ते सायबर गुन्ह्यांचा मास्टरमाइंड
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी अभिषेक कुमार हा एक छोटे चहाचे दुकान चालवायचा. त्यानंतर तो सायबर गुन्ह्याच्या जगतात आला. काही वर्षांपूर्वी तो दुबईला गेला होता. तिथून तो सायबर गुन्ह्याच्या रॅकेटसाठी समन्वय साधण्याचे काम करत होता, असे सांगितले जात आहे. तर त्याचा भाऊ आदित्य कुमार भारतात व्यवहार आणि इतर लॉजिस्टिक्सची कामे हाताळत होता.
प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, या टोळीने फसवणूक करून मिळवलेले पैसे अनेक बँक खात्यांमध्ये वळवले आहेत. नंतर ते पैसे रोख रकमेत रूपांतरित केले, अशी माहिती पोलीस उपायुक्त अवंतिका दिलीप कुमार यांनी दिली. पोलिसांना संशय आहे की, ही साखळी बिहारच्या बाहेर अनेक राज्यात पसरलेली असावी. या टोळीशी संबंधित इतर लोकांचा शोध सुरू आहे.
गोपालगंज पुलिस द्वारा साईबर अपराध कबिलासपुर मॉड्युल का किया गया उदभेदन@bihar_police@BiharHomeDept@DigSaran@Dist_Gopalganj#HainTaiyaarHum #BiharPolice #Bihar #GopalganjPolice pic.twitter.com/nM9WBkrwrQ
— Gopalganj Police (@GopalganjPolice) October 19, 2025
सायबर रॅकेटचे जाळे बंगळुरूपर्यंत
चहावाल्याच्या घरातून जप्त करण्यात आलेले अनेक बँक खात्याचे पासबुक बंगळुरूमधील असल्याचेही निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पोलिसांना आता बिहारच्या बाहेर तपास करावा लागणार आहे. या गुन्ह्याचा संबंध राष्ट्रीय सायबर साखळीशी जोडलेला आहे का? याचाही तपास आता पोलीस करत आहेत.
अटक केलेल्या अभिषेक कुमार आणि आदित्य कुमार या दोघांची दोन दिवसांपासून चौकशी सुरू आहे. या रॅकेटमधील आणखी काही सदस्यांची ओळख पटविण्यासाठी पोलीस जप्त केलेल्या उपकरणांमधील डेटाचे विश्लेषण करत आहेत.