RJD Leader on Bihar Poll: बिहारच्या विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यात मतदान झाल्यानंतर शुक्रवारी (१४ नोव्हेंबर) मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे. उत्तरेतील महत्त्वाच्या राज्याच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे. दरम्यान आरजेडीचे नेते सुनील सिंह यांनी मतमोजणीच्या पूर्वसंध्येला मोठा इशारा दिला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी निकालात छेडछाड केल्यास बिहारमध्ये नेपाळ, बांगलादेशसारखी परस्थिती निर्माण होईल, असे ते म्हणाले.
राष्ट्रीय जनता दलाचे नेते म्हणाले, मतमोजणीत सहभागी असलेल्या सर्व अधिकाऱ्यांना जनतेच्या जनादेशाशी छेडछाड करू नये. जर मतमोजणीत काही गडबड झाली तर बिहारमध्ये नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंकेत दिसला तसा असंतोष निर्माण होऊ शकतो. आमचा पक्ष सतर्क आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी जनतेच्या भावनांविरुद्ध काही कृत्य करू नये.
पक्षातील पदाधिकारी आणि मतदान केंद्रावर उपस्थित राहणार असलेल्या अधिकाऱ्यांना उद्देशून राजद नेते सुनील सिंह म्हणाले, २०२० च्या निवडणुकीत आपले अनेक उमेदवार गडबड करून पराभूत केले गेले. मतमोजणीच्या प्रक्रियेत जर काही गडबड, गोंधळ करण्याचा प्रयत्न केला आणि जनतेने दिलेल्या जनादेशाला पराभूत केले तर बिहारच्या रस्त्यांवर तुम्हाला नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंकेसारखे चित्र पाहायला मिळेल.
सुनील सिंह पुढे म्हणाले, राष्ट्रीय जनता दल या निवडणुकीत १४० ते १६० जागा जिंकेल. तसेच तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली पुढील सरकार स्थापन होईल, अशी अपेक्षा आहे. मतमोजणी प्रक्रियेत कोणत्याही प्रकारच्या अनियमिततेला तोंड देण्यासाठी पक्षाचा दक्षता विभाग सतर्क आहे, असेही ते म्हणाले.
आम्ही सतर्क आहोत. जर चुकीचे काहीही झाले तर सामान्य लोक रस्त्यावर उतरलेले दिसतील. जनादेशाविरोधातील कोणताही निकाल जनता स्वीकारणार नाही. आम्हाला १४० ते १६० जागा मिळतील, असा विश्वास आहे.
सिंह यांच्याविरोधात एफआयआर
सुनील सिंह यांनी प्रक्षोभक विधान केल्यानंतर त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये तणावपूर्ण वातावरण असताना सुनील सिंह यांनी सदर इशारा दिला आहे. १२ नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर वृत्तवाहिन्यांनी अनेक एक्झिट पोल्सचे कल दाखवले. बहुतेक एक्झिट पोल्सनी एनडीएला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दाखवले.
२०२० च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल
| एनडीए | १२५ जागा |
| महागठबंधन | ११० जागा |
पक्षनिहाय निकाल (महागठबंधन)
| पक्ष | जागा |
| राष्ट्रीय जनता दल | ७५ |
| काँग्रेस | १९ |
| डावे | १६ |
पक्षनिहाय निकाल (एनडीए)
| पक्ष | जागा |
| भारतीय जनता पार्टी | ७४ |
| जनता दल (संयुक्त) | ४३ |
| विकासशील इन्सान पार्टी | ४ |
| हिंदुस्तान आवाम मोर्चा | ४ |
बिहारमध्ये शुक्रवारी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू होऊन दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल.
