Cyclone Biparjoy Gujarat Updates: बिपरजॉय चक्रीवादळ अवघ्या काही तासांत गुजरातच्या कच्छ भागातील जखाऊ बंदरावर धडकणार आहे. या पार्श्वभूमीवर किनारपट्टी भागातील हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. मात्र, चक्रीवादळ धडकल्यानंतर त्याचा प्रभाव किती काळ आणि किती क्षेत्रावर राहील, यासंदर्भात सविस्तर आढावा घेऊन आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर एकीकडे भारतातील परिस्थितीवर लक्ष ठेवतानाच भारतानं या नैसर्गिक संकटकाळात तणाव बाजूला सारून पाकिस्तानलाही शक्य ती मदत करण्यासाठी पुढाकार घेतल्याची माहिती भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्यूंजय महापात्रा यांनी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बिपरजॉय चक्रीवादळाचा तडाखा गुजरातच्या किनारपट्टी भागाला बसणार असल्याच्या पार्श्वभूमीवर योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यासाठी किनारी भागातील हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. तसेच, बचाव यंत्रणाही सज्ज झाली असून उद्भवणाऱ्या गंभीर परिस्थितीसाठी एनडीआरएफचे पथकंही सज्ज आहेत. दरम्यान, उद्या सकाळी अर्थात १६ जून रोजी सकाळी या चक्रीवादळाचा वेग कमी होईल, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

“आज दुपारच्या निरीक्षणानुसार जखाऊ बंदरापासून १८० किलोमीटरवर चक्रीवादळ आहे. आज संध्याकाळी किंवा रात्री ते कराची आणि मांडवीमधील किनारी भागात धडकेल. जखाऊ बंदराजवळ त्याचा लँडफॉल असेल. त्यावेळी चक्रीवादळाचा वेग ११० ते १२५ किलोमीटर प्रतीतास असेल. हाच वेग रात्रीपर्यंत कायम राहील. त्यानंतर वेग कमी होत जाईल. शुक्रवारी सकाळपर्यंत वादळाचा वेग ताशी ६५ ते ७० किलोमीटर इतका कमी होईल”, अशी माहिती हवामान विभागाचे महासंचालक मृत्यूंजय महापात्रा यांनी न्यूज १८ शी बोलताना दिली.

पाकिस्तानच्या मदतीसाठी पुढाकार

दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले असतानाही बिपरजॉय चक्रीवादळाच्या नैसर्गक संकटकाळातही भारतानं पाकिस्तानच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. हे चक्रीवादळ कराची आणि मांडवीदरम्यानच्या भागाला धडकणार असल्यामुळे त्याचा फटका काही प्रमाणात पाकिस्तानमधील काही भागालाही बसणार आहे. त्यासाठी पाकिस्तानलाही वेळोवेळी चक्रीवादळाच्या मार्गक्रमणाविषयी सविस्तर माहिती देण्याची भूमिका भारतानं घेतली आहे.

Biparjoy Cyclone चं काळजात धडकी भरवणारं दृश्य; अंतराळवीरानं अवकाशातून टिपली छायाचित्रं!

“पाकिस्तानलाही आम्ही दर काही तासांनी आमचे आंदाज आणि सतर्कतेच्या सूचना जारी करत आहोत. यामध्ये या चक्रीवादळामुळे लाटा किती उंचीच्या उसळतील, वाऱ्याचा वेग किती असेल, पाऊस किती पडेल ही सर्व माहिती आम्ही पाकिस्तानला देत आहोत”, अशी माहिती मृत्यूंजय महापात्रा यांनी दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Biparjoy cyclone to hit gujrat jakhau port imd dg mrutyunjay mohapatra pmw