अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं आज महत्त्वपूर्ण निकाल दिला. या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. याव्यतिरिक्त सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचे आदेशही न्यायालयानं मुंबई पोलिसांना दिले आहेत. पाटण्यामध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिसांकडे वर्ग करा, अशी मागणी एका याचिकेच्या माध्यमातून अभिनेत्री रिया चक्रवर्तीने केली होती. त्यावर न्यायालयानं निकाल दिला. दरम्यान, यानंतर अनेक स्तरातून प्रतिक्रिया हेत आहेत. भाजपा नेते संबित पात्रा यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर रिया चक्रवर्तीच्या नावावरून राज्य सरकारला डिवचलं आहे.
“सुनने में आया है महाराष्ट्र सरकार अब रो ‘रिया’ है!,” असं म्हणत संबित पात्रा यांनी राज्य सरकारला डिवचलं. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.
सुनने में आया है महाराष्ट्र सरकार अब रो “रिया” है!
— Sambit Patra (@sambitswaraj) August 19, 2020
आणखी वाचा- सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण: CBI कडे तपास सोपवण्याच्या निर्णयाचे भाजपाकडून स्वागत
सोमय्यांकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
“सुशांत सिंह प्रकरणात महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्वरित राजीनामा द्यायला हवा. मुंबई पोलीस आयुक्तांनी दोन महिने एफआयआर दाखल करून न घेणं हे दुर्देवी आहे. यातून ठाकरे सरकार काही बोध घेईल अशी आशा आहे. सुशांत सिंह राजपुतच्या कुटुंबीयांना आता न्याय मिळेल,” असं सोमय्या म्हणाले.
आणखी वाचा- कोणाला वाचवण्याचे प्रयत्न सुरु होते हे महाराष्ट्र सरकारने आता तरी सांगावे : भाजपा
संघर्षमय वातावरण
१४ जून रोजी मुंबईतील राहत्या घरी सुशांत मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यू प्रकरणाचा गुंता दिवसेंदिवस वाढत गेला. सुशांतने नेमकी आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. सुशांतच्या मृत्यूनंतर जवळपास दीड महिन्याने त्याचे वडील के. के. सिंह यांनी पाटणा पोलिसांकडे रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल केली. त्यांनी रियावर अनेक गंभीर आरोप केले. त्यांच्या तक्रारीवरून पाटणा पोलिसांनी रियाविरोधात गुन्हा दाखल केला. बिहारमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर बिहार पोलीस विरुद्ध मुंबई पोलीसच नव्हे तर दोन्ही राज्यातील सरकारमध्येही संघर्षमय वातावरण निर्माण झालं.
