BJP MLA T Raja Singh Resigns : तेलंगणात भारतीय जनता पक्षाला सर्वात मोठा धक्का बसला आहे. भाजपाचे आमदार टी राजा सिंह यांनी पक्षाचा तडकाफडकी राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तेलंगणाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. आमदार टी राजा सिंह यांनी भाजपाचा राजीनामा का दिला? याबाबत आता अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

आमदार टी राजा सिंह यांनी आज तेलंगणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष जी किशन रेड्डी यांना एक पत्र लिहिलं. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या तेलंगणाच्या राज्याच्या नेतृत्वासाठी सुरु असलेल्या संघर्षावरून टी राजा सिंह हे नाराज असल्याचं बोललं जात आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

टी राजा सिंह यांनी एक पत्र लिहिलं असून त्या पत्रात त्यांनी म्हटलं की, रामचंद्र राव यांची भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय हा त्यांच्यासाठी धक्कादायक आहे. याबाबत टी राजा सिंह यांनी नाराजी व्यक्त करत आपला राजीनामा तेलंगणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष जी किशन रेड्डी यांच्याकडे पाठवला असल्याचं वृत्त समोर आलं आहे.

दरम्यान, यावेळी आमदार टी राजा सिंह यांनी म्हटलं की, “अनेक लोकांच्या मौनाचा अर्थ एखाद्या निर्णयामध्ये संमती म्हणून घेतला जाऊ नये. मी केवळ माझ्यासाठी नाही तर असंख्य कार्यकर्ते आणि मतदारांसाठी बोलत आहे. जे विश्वासाने आमच्याबरोबर उभे राहिले आणि ज्यांना आज विश्वासघात झाल्या सारखं वाटत आहे.”

टी राजा सिंह यांनी राजीनामा देण्याचं कारण काय?

तेलंगणा भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी एन रामचंद्र राव यांचं नाव निश्चित झाल्यानंतर टी राजा सिंह यांनी राजीनामा दिला आहे. कारण तेलंगणा भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष एन रामचंद्र राव हे होणार असल्यामुळे टी राजा सिंह हे नाराज झाल्याची चर्चा आहे. एन रामचंद्र राव यांचं नाव समोर आल्यानंतर टी राजा सिंह यांनी लगेच भाजपाचा राजीनामा दिला आहे.

भाजपा तेलंगणाचे विद्यामान प्रदेशाध्यक्ष जी किशन रेड्डी यांना पत्र लिहित रामचंद्र राव यांची भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय आपल्यासाठी निराशाजनक असल्याचं टी राजा सिंह यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत म्हटलं आहे. तसेच आपल्या राज्यात असे अनेक सक्षम ज्येष्ठ नेते, आमदार आणि खासदार आहेत. ज्यांनी भाजपाच्या वाढीसाठी अथक परिश्रम केले आहेत आणि ज्यांच्याकडे पक्षाला पुढे नेण्याची ताकद, विश्वासार्हता आणि जोड असल्याचंही टी राजा सिंह यांनी म्हटलं आहे.

प्रखर हिंदुत्ववादी अशी ओळख

तेलंगणातील भाजपाचे लोकप्रिय नेते आणि प्रखर हिंदुत्ववादी अशी ओळख टी. राजा सिंह यांची आहे. ते तेलंगणाच्या गोशामहल या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. टी राजा सिंह हे नेहमी कोणत्या न कोणत्या कारणांनी कायम चर्चेत असतात. त्यांच्या विधानांमुळे अनेकदा वाद देखील निर्माण झाल्याचं पहायला मिळालेलं आहे.