Mumbai-Delhi Flight Bomb Threat: मुंबईवरून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवार सकाळी ही घटना घडली आहे. इंडिगोचं फ्लाइट क्रमांक ६ ई ७६२ हे विमान मुंबईहून राजधानी दिल्लीला जात होतं. या विमानात तब्बल २०० लोक प्रवाशी प्रवास करत आहेत. याच दरम्यान विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर दिल्ली विमानतळावर आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेदरम्यान नेमकं काय घडलं? याबाबत आता इंडिगोने स्पष्टीकरण दिलं आहे.

इंडिगोने काय स्पष्टीकरण दिलं?

फ्लाइट क्रमांक ६ ई ७६२ या विमानाला बॉम्बच्या धमकीच्या घटनेनंतर एअर इंडिगोने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. इंडिगोच्या प्रवक्त्याने सांगितलं की, “३० सप्टेंबर २०२५ रोजी मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमान ६ ई ७६२ मध्ये सुरक्षेचा धोका आढळून आला. त्यानंतर सर्व प्रोटोकॉलचं पालन करून आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ याबाबतची माहिती कळवली. तसेच विमानाला उड्डाणासाठी परवानगी देण्यापूर्वी आवश्यक सुरक्षा तपासणी करण्यासाठी प्रशासनाला पूर्ण सहकार्य केलं. आवश्यक त्या सर्व सुरक्षा तपासण्या करण्यात येत आहेत”, असं इंडिगोने म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त पीटीआय वृत्तसंस्थेच्या हवाल्याने इंडिया टिव्हीने दिलं आहे.

दिल्ली विमानतळावर आणीबाणी जाहीर

सूत्रांच्या माहितीनुसार, दिल्ली विमानतळावर विमानासाठी पूर्ण आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत इंडिगोच्या प्रवक्त्याने सांगितलं की, “आम्ही आमच्या प्रवाशांची कमीत कमी गैरसोय व्हावी, यासाठी सर्व प्रयत्न केले आहेत. त्यामध्ये त्या प्रवाशांना अल्पोपहार देणं आणि नियमित अपडेट्स शेअर करण्यासह आदी गोष्टींचा समावेश आहे.”

इंडिगोच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी

गेल्या आठवड्यात मुंबईवरून थायलंडमधील फुकेतला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचं चेन्नई विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं होतं. सीआयएसएफचे कर्मचारी आणि विमानतळावरील अधिकाऱ्यांनी विमानाची तपासणी केली असता ही धमकी खोटी असल्याची माहिती आढळून आली होती. तरीही याबाबतचा अधिक चौकशी सुरू आहे असं सांगण्यात आलं होतं.

१९ सप्टेंबर रोजी मुंबईहून फुकेतला जाणारं इंडिगोचं विमान ६ ई १०८९ या विमानात सुरक्षेचा धोका आढळल्याने चेन्नईकडे वळवण्यात आलं होतं, असं एअरलाइन्सने म्हटलं होतं. त्यानंतर प्रोटोकॉलनुसार संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ माहिती देण्यात आली होती आणि चेन्नईमध्ये विमानाची आवश्यक सुरक्षा तपासणी करण्यात आली होती.