लखीमपूर खेरी इथल्या संघर्षानंतर शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी निघालेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींना पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतलं. त्यांना सीतापूर इथल्या विश्रामगृहात ठेवण्यात आलं होतं. आता त्यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आले असून सीतापूर विश्रामगृहातच तात्पुरतं जेल उभारत बंदिस्त करण्यात आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्य़ातील टिकोनिया येथे शेतकरी आंदोलनादरम्यान रविवारी हिंसाचार घडला. त्यात आठजण ठार झाले, तर अनेकजण जखमी झाले. मृतांमध्ये चार शेतकऱ्यांचा समावेश आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांच्या बनवीरपूर गावात ही घटना घडली. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे एका कार्यक्रमासाठी गावात येणार होते. मौर्य यांच्या विरोधात निदर्शने करण्यासाठी जमलेल्या कृषी कायदेविरोधी शेतकरी आंदोलकांवर कथितरीत्या दोन कार घुसवल्यानंतर हिंसाचार घडला. आंदोलकांनी या दोन गाड्यांना आग लावल्याचाही आरोप करण्यात येत आहे. या घटनेनंतर रात्री उशीरा या ठिकाणी पाहणीसाठी पोहचलेल्या काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना सोमवारी पोलिसांनी ताब्यात घेतलं. रविवारी रात्री अकराच्या सुमरास प्रियंका गांधी लखीमपूर खेरी येथील घटनास्थळी जाण्यासाठी रवाना झाल्या होत्या.

या घटनेचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले आहेत. हा नरसंहार असून, शेतकऱ्यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली. समाजवादी पक्ष, राजदसह अन्य पक्षांनीही या घटनेवरून भाजप सरकारला लक्ष्य केले आहे. या घटनेनंतर शेतकरी नेते राकेश टिकैत रविवारी गाझिपूरहून लखीमपूर खेरीकडे गेले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case registered against priyanka gandhi temporary jail in sitapur guest house vsk