पीटीआय, नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) ‘आप’चे ज्येष्ठ नेते मनीष सिसोदियांचा छळ होत असून, खोटय़ा कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी रविवारी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिल्ली सरकारचे मद्य धोरण व अबकारी धोरणात अनियमितता प्रकरणाच्या चौकशीत कथितरित्या सहकार्य न करणे व तपासकाम करणाऱ्यांच्या प्रश्नांना टाळण्याच्या आरोपांखाली सिसोदियांना २६ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. ‘सीबीआय’च्या विशेष न्यायालयाने सिसोदियांच्या कोठडीत ६ मार्चपर्यंत वाढ केली होती. सिसोदियांनी २८ फेब्रुवारी रोजी अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

‘सीबीआय’ अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार अबकारी धोरणावरील तज्ज्ञ समितीच्या शिफारशींवरील कायदेशीर मत दिलेली महत्त्वपूर्ण गहाळ फाईल शोधण्यासाठी सिसोदियांची कोठडीदरम्यान चौकशी करायची आहे. मात्र, भारद्वाज यांनी रविवारी येथे पत्रकारांशी बोलताना आरोप केला, की सिसोदिया यांचा ‘सीबीआय’कडून छळ केला जात आहे आणि त्यांच्यावर खोटे आरोप करणाऱ्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठी दबाव आणला जात आहे. ‘सीबीआय’कडे सिसोदियांविरुद्ध कोणतेही पुरावे नाहीत. त्यांनी कोणतेही पुरावे गायब केल्याचे कधीही सांगितलेले नाही. ‘सीबीआय’ने सिसोदियांच्या निवासस्थानावरही छापा टाकला होता. मात्र, तेथेही त्यांना काहीही आक्षेपार्ह मिळाले नाही.

पाच दिवसांच्या ‘सीबीआय’ कोठडीची मुदत संपल्यानंतर सिसोदियांना शनिवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी आपल्याला आठ-नऊ तास बसवून ठेवले जाते व वारंवार एकच प्रश्न विचारला जात असल्याची तक्रार न्यायालयाकडे केली होती. हा मानसिक छळ असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. यावर गेल्या सुनावणीत ‘सीबीआय’ने ‘थर्ड डिग्री’ न वापरण्याचा आदेश देणाऱ्या न्यायाधीशांनी ‘सीबीआय’ला एकच प्रश्न वारंवार विचारू नये, जर तुमच्याकडे काही नवीन विचारण्याजोगे असेल तर विचारा, असे आदेश दिले होते.

सिबल यांच्या ‘इन्साफ मंच’ला केजरीवाल यांचा पाठिंबा

नवी दिल्ली : ज्येष्ठ नेते, वकील व खासदार कपिल सिबल यांच्या ‘इन्साफ’ या नव्या मंचात अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सामील होण्याचे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी सर्वाना केले. राज्यसभा सदस्य सिबल यांनी शनिवारी जाहीर केले होते, की ते देशातील अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी ‘इन्साफ’ नावाचे नवीन व्यासपीठ स्थापन करत आहेत. त्यांनी यावेळी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षांच्या इतर नेत्यांचा या मंचास पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. केजरीवाल यांनी हिंदीत ‘ट्वीट’ केले, की कपिल सिबल यांचा हा अतिशय महत्त्वाचा उपक्रम आहे. सर्वानी यात सामील व्हावे, असे आवाहन मी करतो. आम्ही एकत्र येऊन अन्यायाविरुद्ध लढू.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cbi pressured manish sisodia sign fake documents aap alleges torture in custody ysh