Advance Tip by Uber Cab: कधीकाळी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं पूर्णपणे वर्चस्व असणाऱ्या प्रवासी वाहतुकीचं क्षेत्र आता खासगी वाहतूकदारांनी बऱ्याच अंशी व्यापलेलं आहे. त्यात अशा सेवा देणाऱ्या कॅब कंपन्यांनी बाजारपेठेत प्रवेश केल्यापासून तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसमोर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या कंपन्यांकडून आकारण्यात येणारं भाडं आणि त्यात मनमानी पद्धतीने केले जाणारे बदल नेहमीच चर्चेत असतात. आता या प्रवासी भाड्यासोबतच ग्राहकांना लुटण्याचा आणखी एक प्रकार या कंपन्यांनी चालवला असून त्यावर केंद्रीय मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Ola, Uber, Rapido, Bla Bla, Meru, Cool cab अशा अनेक कंपन्या हल्ली खासगी प्रवासी वाहतूक सेवा पुरवतात. या कंपन्यांच्या मोबाईल अॅपमधून ग्राहकांनी आपल्याला हव्या त्या ठिकाणी जाण्यासाठी कॅब बुक करायची, त्यावर कंपनीकडून ठरवण्यात आलेलं भाडं दाखवण्यात येईल आणि प्रवास संपल्यावर ग्राहकानं रोख किंवा ऑनलाईन स्वरूपात ते द्यायचं अशी साधारण प्रक्रिया असते. यात कंपनीकडून वाट्टेल तसे भाड्याचे दर आकारले जात असल्याबद्दल अनेकदा नाराजी व्यक्त होत असते. त्यातच आता Advance Tip या प्रकाराची भर पडली आहे.
केंद्रीय मंत्र्यांचा संताप, Uber ला नोटीस!
दरम्यान, केंद्रीय ग्राहक सेवा विभागाचे मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, CCPA अर्थात सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटीकडून उबर कॅब कंपनीला यासंदर्भात नोटीसदेखील पाठवली आहे.
“कॅब कंपन्यांकडून ग्राहकांना Advance Tip ची मागणी केली जाणं हा चिंताजनक विषय आहे. ग्राहकांना अशा प्रकारे वेगवान सेवेसाठी अतिरिक्त टिप देण्यासाठी भाग पाडलं जाणं हे अनैतिक असून शोषण करणारं आहे. अशा कृती या व्यापारविषयक मूल्यांच्या दृष्टीने चुकीच्या ठरतात. कोणत्याही व्यवहारात टिप ही सेवा पूर्णपणे दिल्यानंतर सेवा देणाऱ्याचा अधिकार म्हणून नव्हे तर संबंधिताचं कामाची पोचपावती म्हणून दिली जाते”, असं प्रल्हाद जोशी यांनी केलेल्या सोशल पोस्टमध्ये म्हटलं आहे.
“या प्रकाराची दखल घेऊन मी सीसीपीएला यात लक्ष घालण्यास सांगितलं आहे. आज सीसीपीएनं यासंदर्भात उबेर कंपनीला नोटीस बजावली असून स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत. ग्राहकांशी होणाऱ्या कोणत्याही व्यवहारात न्याय्य, पारदर्शकता व जबाबदार वर्तन पाळलं जायलाच हवं”, असंही जोशी यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
कशी मागितली जाते कंपन्यांकडून Tip ?
कॅब सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांकडून कॅब बुक करतानाच टिप देण्यासंदर्भातला पर्याय ग्राहकांना दर्शवला जातो. हे टिप देणं जरी ऐच्छिक असलं, तरी टिप दिल्याशिवाय कॅब बुकच होत नसल्याचा अनुभव अनेक ग्राहकांनी प्रल्हाद जोशी यांच्या पोस्टखाली सांगितला आहे.
उबेर कंपनीकडून “लवकर पिकअप मिळवण्यासाठी टिप द्या, जर तुम्ही टिप दिली, तर एखादा चालक तुमची बुकिंग विनंती लवकर स्वीकारण्याची शक्यता आहे”, असा मेसेज या कंपन्यांकडून मोबाईल अॅपवर दर्शवला जातो. तसेच, एकदा टिप समाविष्ट केली, की नंतर त्यात बदल करता येणार नसल्याचंही काही कंपन्यांकडून ग्राहकांना सांगितलं जातं.
मोबाईलनुसार भाडे आकारणी?
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी या कंपन्यांविरोधात आणखी एक तक्रार करण्यात येत होती. बुकिंग करणाऱ्या मोबाईलवरील ऑपरेटिंग सिस्टीम अँड्रॉइड आहे की आयओएस (आयफोन), यावरून सारख्याच प्रवासासाठी वेगवेगळे दर आकारले जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. सीसीपीएनं त्याबाबत ओला व उबेरला नोटीसही बजावली होती. पण या दोन्ही कंपन्यांनी हे आरोप फेटाळले होते.