पीटीआय, नवी दिल्ली
चीनबरोबर न सुटलेला सीमावाद हा सर्वात मोठा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असून, त्यानंतर पाकिस्तानचे छुपे युद्ध आणि त्याद्वारे भारताला विविध कट रचून रक्तबंबाळ करण्याची त्यांची रणनीती आहे, असे संरक्षण प्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी शुक्रवारी सांगितले. प्रादेशिक अस्थिरता आणि त्याचा भारतावर होणारा परिणाम, तसेच उच्च तंत्रज्ञानासह भविष्यातील युद्धजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक तयारी ही तिसरी आणि चौथी मोठी आव्हाने असल्याचे चौहान यांनी स्पष्ट केले.
उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिरात शुक्रवारी श्रीमद् भागवत कथा परिसंवाद आणि श्रद्धांजली सभेवेळी संरक्षण दलप्रमुख जनरल अनिल चौहान बोलत होते. या वेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. ‘भारताला आता कोणत्याही प्रकारच्या पारंपरिक युद्धासाठी तयार राहावे लागेल.
अण्वस्त्रधारी दोन शत्रूंकडून निर्माण होणाऱ्या धोक्यांना तोंड देणे हे भारतासमोरील आणखी एक मोठे आव्हान आहे,’ असे चौहान म्हणाले. ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहीम राबविण्यासाठी सशस्त्र दलांना पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले होते. या मोहिमेचा उद्देश केवळ पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेणे नव्हते, तर सीमापार दहशतवाद संपवणे हे त्यामागील उद्दिष्ट होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘मी चीनबरोबरचा न सुटलेला सीमावाद सर्वांत मोठे आव्हान मानतो. दुसरे मोठे आव्हान म्हणजे पाकिस्तानकडून भारताविरुद्ध चालवले जाणारे छुपे युद्ध’, असे चौहान म्हणाले. दरम्यान, पहिल्यांदाच एका सार्वजनिक ठिकाणी चौहान यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या भूमिकेचे कौतुक केले.
‘राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यात त्यांनी लष्कराला मार्गदर्शन केले, तसेच लक्ष्य निवड, सैन्य तैनाती, मुत्सद्देगिरीचा प्रभावी वापर आदींचाही यात समावेश होता.’