दक्षिण दिल्लीतल्या एका खासगी शैक्षणिक संस्थेचा संचालक असलेल्या स्वामी चैतन्यानंदवर १७ मुलींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. रविवारी आग्रा येथील एका हॉटेलमधून त्याला अटक करण्यात आली. चैतन्यानंद उर्फ पार्थसारथीकडून पोलिसांनी बनावट व्हिजिटिंग कार्ड्स जप्त केली आहेत. यापैकी एका कार्डवर चैतन्यानंदने आपण भारताचे संयुक्त राष्ट्रांमध्ये राजदूत आहोत असंही छापलं आहे. पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत.
पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चैतन्यानंदकडून त्यांनी तीन मोबाइल आणि एक आयपॅडही जप्त केला आहे. आरोपीला दिल्लीला आणण्यात आलं. त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चैतन्यानंद मागच्या दोन महिन्यांपासून मथुरा, आग्रा, वृंदावन या ठिकाणी असलेल्या विविध १३ हॉटेल्समध्ये मुक्काम करत होता. सीसीटीव्ही पासून स्वतःचा बचाव करत होता. स्वामी चैतन्यानंद हा त्याच्या कर्मचाऱ्यांकडून फोन करायचा आणि स्वतःला पंतप्रधान कार्यालयाचा सदस्य असल्याचं सांगायचा अशीही माहितीही समोर आली आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.
बाथरुममध्ये छुपे कॅमेरे लावले आणि…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलींच्या वसतिगृहातील बाथरुममध्ये लावण्यात आलेले कॅमेरे हे चैतन्यानंदच्या मोबाइलशी जोडलेले होते. मुली बाथरुममध्ये अंघोळीसाठी गेल्या की चैतन्यानंद त्यांचे व्हिडीओ रेकॉर्ड करायचा आणि त्यांना ते व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल करत आपल्या जाळ्यात ओढायचा. या सगळ्या कटात त्याचे सहकारीही होते. या बाबाने सगळ्या संस्थेवर कब्जा केला होता. त्याने त्याच्या मर्जीतल्या लोकांना तिथे नियुक्त केलं होतं. कोर्टाने स्वामी चैतन्यानंदला पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत धाडलं आहे. पोलिसांनी जास्त दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. त्यासाठी पोलिसांनी हे कारण दिलं की आरोपी दोन महिन्यांपासून फरार होता. त्याने फक्त पुराव्यांशी छेडछाड केली नाही तर तक्रारकर्त्या मुलींनाही धमक्या दिल्या. पोलिसांचं म्हणणं आहे की तपासासाठी त्याला दिल्ली, उत्तराखंड, हरियाणा सह इतर ठिकाणी घेऊन जाणं आवश्यक आहे.
पोलिसांनी आणखी काय सांगितलं?
पोलिसांनी न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार पासवर्ड सारख्या महत्त्वाच्या गोष्टी त्याची चौकशी करुनच आम्हाला मिळतील. डिजिटल संदेश आणि डेटा डिलिशन सारखे प्रकार त्याने केले आहेत त्यामुळे त्याचा ताबा जास्त दिवस मिळावा. दरम्यान यावर बचाव पक्षाने सांगितलं की पोलिसांकडे ४० सीसीटीव्ही कॅमेरांचं फुटेज आहे. त्यातून ते पुरावे शोधू शकतात.
यानंतर पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं की स्वामी चैतन्यानंदने लेडिज हॉस्टेलच्या बाथरुममध्ये कॅमेरे लावले होते. त्या कॅमेरांचं कनेक्शन या बाबाच्या मोबाइलशी जोडलं गेलं होतं. तो कॅमेरांद्वारे मुलींचे व्हिडीओ रेकॉर्ड करायचा आणि त्यांना ब्लॅकमेल करायचा, त्यांचा लैंगिक छळ करायचा. आता पोलीस पाच दिवसांच्या कोठडीत आणखी काय काय चौकशी करतात आणि या बाबाचं काय सत्य समोर आणतात हे पाहणं महत्त्वाचं असेल.