गेल्या दोन आठवड्यांपासून पंजाबमध्ये सुरू असलेला राजकीय कलह अजूनही थांबण्याचं नाव घेत नाहीये. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवजोतसिंग सिद्धू आणि मंत्री रझिया सुलताना यांनी देखील राजीनामा दिला आहे. मात्र, आता पंजाबपाठोपाठ छत्तीसगडमध्ये देखील काँग्रेसला ग्रहण लागणार की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आणि त्याला कारणीभूत ठरलीये राज्यातील १२ ते १५ आमदारांची दिल्ली वारी. हे सर्व आमदार अचानक एकत्र दिल्लीत कसे गेले? यावरून तर्क-वितर्क सुरू झाले असून सिंग देव यांच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्याच्या हालचाली सुरू झाल्याचं बोललं जात आहे.

काय घडतंय छत्तीसगडमध्ये?

छत्तीसगडमधले किमान १२ ते १५ आमदार बुधवारी थेट राजधानी दिल्लीत हायकमांडची भेट घेण्यासाठी पोहोचले. एकीकडे छत्तीसगडमध्ये हे आमदार मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी दिल्लीत गेल्याचं सांगितलं जात असताना या आमदारांनी मात्र वेगळंच कारण सांगितलं आहे. दिल्लीत पोहोचताच या आमदारांनी “आम्ही राहुल गांधी यांच्या प्रस्तावित छत्तीसगड दौऱ्यासाठी त्यांना आमंत्रण देण्यासाठी आलो”, अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे नेमकं या भेटीमागे काय कारण असू शकतं, याचे आडाखे बांधले जात आहेत.

अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाची डील?

छत्तीसगडचे आरोग्यमंत्री टी. एस. सिंह देव यांच्यासोबत मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे मतभेद टोकाला गेल्याचं मध्यंतरी समोर आलं होतं. टी. एस. सिंह देव याच्यामते २०१८मध्ये राज्यात भाजपाला पराभूत करून काँग्रेसचं सरकार आल, तेव्हा अडीच वर्ष भूपेश बघेल मुख्यमंत्री राहतील आणि त्यानंतर सिंह देव यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवलं जाईल, असं ठरलं होतं. या वर्षी जानेवारी महिन्यात बघेल यांच्या मुख्यमंत्रीपदाची अडीच वर्ष देखील पूर्ण झाली आहेत.

भूपेश बघेल-सिंह देव यांच्यात मतभेद

मात्र, छत्तीसगडचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पी. एल. पुनिया यांनी त्याच वेळी असं काहीही ठरलं नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यापाठोपाठ भूपेश बघेल आणि टी. एस. सिंह देव यांनी दिल्लीत हायकमांडची भेट देखील घेतली होती. राज्यात परतल्यानंतर भूपेश बघेल हेच मुख्यमंत्रीपदावर कायम राहणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. या काळात राज्यातील काँग्रेसच्या ७० आमदारांपैकी किमान ५४ आमदारांनी बघेल यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि शक्तीप्रदर्शन करण्यासाठी दिल्ली गाठली होती.

दरम्यान, ऑगस्ट महिन्यात देखील या दोन्ही नेत्यांमध्ये मुख्यमंत्रीपदावरून वाद सुरू असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यांच्यातील मतभेद मिटवण्यासाठी काँग्रेस हायकमांडने या दोघांना दिल्लीत बोलावून त्यांच्यात समझोता घडवून आणल्याचं देखील सांगितलं गेलं. मात्र, या सर्व पार्श्वभूमीवर आता पुन्हा हे सर्व आमदार दिल्लीत गेल्यामुळे राज्यात नेतृत्वबदलाचे वारे वाहू लागल्याचं दिसून येत आहे.