Chief of Defence Staff Anil Chauhan on loss of aircraft during India Pakistan air conflict : जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमालीचा वाढला होता. यानंतर दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले देखील करण्यात आले. या दरम्यान भारताची विमाने पाडल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला होता. यानंतर आता सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी केलेले एक विधान सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

पाकिस्तानबरोबर झालेल्या संघर्षाच्या पहिल्या दिवशी नुकसान झाल्यानंतर भारताने आपली रणनीती बदलली आणि तीन दिवसांनंतर दोन्ही देशांनी शस्त्रविराम जाहीर करण्यापूर्वी भारताने निर्णायक आघाडी मिळवली, असे सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी शनिवारी सांगितले. यानंतर चौहान यांच्या विधानाची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.

जनरल अनिल चौहान नेमकं काय म्हणाले?

चीफ डिफेन्स स्टाफ जनरल (CDS) अनिल चौहान यांनी एका मुलाखतीत बोलताना सांगितले की, सुरुवातीला भारताचे नुकसान झाले, पण पुढे बोलताना त्यांनी याबद्दलचा तपशील देण्यास नकार दिला. पाकिस्तानने भारताची विमाने पाडल्याचा दावा केल्याबद्दल विचारले असता चौहान म्हणाले की, “महत्त्वाचे हे होते की हे नुकासान का झाले आणि आपण त्यानंतर काय करणार.” ते सिंगापूर येथे Shangri-La Dialogue सेक्युरिटी फोरमदरम्यान रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीदरम्यान बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, “म्हणून आम्ही रणनीतीमध्ये सुधारणा केली आणि नंतर ७, ८ आणि १० तारखेला मोठ्या संख्येने पाकिस्तानच्या आतमध्ये असलेल्या हवाई तळांना लक्ष्य करण्यासाठी परत गेलो, त्यांची सर्व हवाई सुरक्षा यंत्रणा भेदल्या, अचूक हल्ले केले.” १० तारखेला भारतीय हवाई दलाने सर्व प्रकारच्या विमानांची सर्व प्रकारच्या शस्त्रांसह उड्डाणे केली, असेही चौहान यांनी यावेळी सांगितले.

भारताचे डायरेक्टर जनरल ऑफ एअर ऑपरेशन, एअर मार्शल ए. के. भारती यांनी महिन्याच्या सुरुवातीला घेतलेल्या पत्रकार परिषदेत नुकसान हा युद्धाचा एक भाग आहे, असे सांगितले होते. तसेच त्यांनी भारताने काही पाकिस्तानी विमाने पाडल्याचेही म्हटले होते. पाकिस्तानने मात्र विमानांचे नुकसान झाल्याची बाब नाकारली होती, पण त्यांच्या हवाई तळांना काही प्रमाणात नुकसान झाल्याचे मान्य केले होते, यातही नुकसान किरकोळ असल्याचा पाकिस्तानने दावा केला होता.

“बहुतेक हल्ले हे अत्यंत अचूकतेने करण्यात आले, काही तर आपण जो इम्पॅक्ट पॉइंट निवडला त्याच्या एक मिटरपर्यंतच्या अचूकतेने करण्यात आले,” असे चौहान यांनी यावेळी बोलताना सांगितले.

भारत – पाकिस्तान संघर्षादरम्यान अण्वस्त्रांचा विचार केला जाईल असा धोका कधीही नव्हता, असे चौहान आणि पाकिस्तानचे चेअरमन ऑफ द जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ, जनरल साहिर शमशाद मिर्झा या दोघांनी देखील म्हटले आहे. या मुद्द्यावर बोलताना चौहान म्हणाले की, “मला वाटतं की अण्वस्त्रांची पातळी ओलांडली जाण्याआधी खूप जागा शिल्लक आहे, त्याच्याआधी खूप इशारे दिले जातील, मला वाटतं तसं काही होणार नाही.” तसेच पाकिस्तान चीनशी जवळचे संबंध असले तरी, संघर्षादरम्यान चीनकडून प्रत्यक्ष मदत मिळण्याचे कोणतेही चिन्ह आढळले नाही, असेही चौहान यांनी स्पष्ट केले.