US and China : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी आयातीवर १०० टक्के अतिरिक्त कर लावण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता. त्यांच्या निर्णयाला चीननेही जशास तसं प्रत्युत्तर दिलं होतं. त्यामुळे अमेरिका आणि चीनमध्ये काही दिवसांपूर्वी टॅरिफ वॉर रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र, आता अमेरिका आणि चीनमध्ये मैत्रीचा नवा अध्याय सुरू झाल्याचं दिसत आहे.

गेल्या आठवड्यात चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात एक महत्वाची बैठक झाली होती. या बैठकीत अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचं बोललं जात होतं. शी जिनपिंग आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीनंतर दोन्ही देशांनी संरक्षण क्षेत्रात सहकार्य वाढण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता काही दिवसांतच चीनने एक मोठी घोषणा केली आहे. अमेरिकन वस्तूंवरील २४ टक्के आयातशुल्क पुढील एका वर्षांसाठी हटवण्याचा निर्णय चीनने घेतला आहे. या संदर्भातील वृत्त रॉयटर्सच्या हवाल्याने इंडिया टुडेनी दिलं आहे.

चीनने अमेरिकन वस्तूंवरील अतिरिक्त २४ टक्के आयातशुल्क एका वर्षासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच १० टक्के कर कायम ठेवला आहे, अशी घोषणा स्टेट कौन्सिल टॅरिफ कमिशनने बुधवारी केली आहे. त्यामुळे जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील व्यापार तणाव कमी करण्याच्या दिशेने चीनचं हे एक पाऊल असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, टॅरिफ आणि प्रति-टॅरिफ अशा दोन्ही देशांच्या भूमिकेनंतर सुरू झालेल्या आर्थिक संघर्षानंतर द्विपक्षीय व्यापार संबंध स्थिर करण्यासाठी काही निर्णय घेण्याची आवश्यकता होती. याच पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या या प्रयत्नांचा एक भाग म्हणून या निर्णयाकडे पाहिलं जात आहे. या निर्णयाचा फायदा सोयाबीन, मका, गहू आणि मांस यासारख्या उत्पादनांच्या अमेरिकन निर्यातदारांना होण्याची शक्यता आहे. कारण दोन्ही देशांमधील व्यापार वादामुळे सर्वात जास्त फटका या उत्पादनांना बसला होता.

अमेरिका-चीनमध्ये मैत्रीचा नवा अध्याय

अमेरिका आणि चीनमध्ये टॅरिफच्या मुद्यांवरून आजही उघडपणे मतभेद आहेत. पण असं असतानाही आता अमेरिका आणि चीनमध्ये मैत्रीचा नवा अध्याय सुरू झाल्याचं दिसून येत आहे. दोन्ही देशांनी संरक्षण क्षेत्रात सहकार्य वाढण्याचा निर्णय घेतला आहे. आता अमेरिका आणि चीन या दोन देशांच्या लष्करांमध्ये थेट संवाद साधण्यासाठी एक अनौपचारिक किंवा औपचारिक माध्यम तयार करण्यास सहमती दर्शवली आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे

डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच शी जिनपिंग यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर काही दिवसांतच अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे सचिव पीट हेगसेथ यांनी रविवारी सांगितलं की, “त्यांनी चीनचे संरक्षण मंत्री अॅडमिरल डोंग जून यांची भेट घेतली आणि दोघांनीही दोन्ही देशांतील संवाद मजबूत करण्यास तसेच द्विपक्षीय संबंधांमध्ये स्थिरता राखण्यास आणि उद्भवणाऱ्या कोणत्याही समस्या सोडवण्यासाठी आणि दोन्ही देशांतील तणाव कमी करण्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांतील लष्कर ते लष्कर असा संवाद घडवून आणण्यासाठी चॅनेल स्थापित करण्यास सहमती दर्शवण्यात आली.”