China K Visa : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील काही महिन्यांपासून वेगवेगळ्या निर्णयांचा धडाका लावला आहे. आयातशुल्काच्या संदर्भातील निर्णयाची मोठी चर्चा सुरू असतानाच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक मोठा निर्णय घेत भारताला धक्का दिला आहे. नवीन एच-१बी व्हिसासाठी तब्बल १ लाख डॉलर्स म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये ८८ लाख रुपये शुल्क देण्याच्या संदर्भातील निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फटका भारताला बसणार असल्याचं सांगितलं जात आहे.
अमेरिकेने एच-१बी व्हिसाबद्दल अचानक जाहीर केलेल्या नवीन आदेशामुळे अमेरिकेत नोकरी करण्यासाठी जाणाऱ्या भारतीयांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान, अमेरिकेच्या एच-१बी व्हिसाच्या संदर्भातील गोंधळ सुरू असतानाच चीनने एक मोठा निर्णय घेतला आहे. जगभरातील तरुणांना विशेषतः तंत्रज्ञान, अभियांत्रिकीसह आदी महत्वाच्या क्षेत्रातील तरुणांना आकर्षित करण्यासाठी चीनने रविवारी ‘के व्हिसा’ श्रेणी सुरू करण्याची घोषणा केली आहे. तसेच हा निर्णय १ ऑक्टोबर २०२५ पासून लागू होणार असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
‘के व्हिसा’साठी कोण अर्ज करू शकतो?
चीनच्या मते के व्हिसा विदेशी तरुण वैज्ञानिक आणि अभियांत्रिकीसह आदी महत्वाच्या क्षेत्रातील व्यक्तींसाठी असेल. ज्यांनी चीन किंवा विदेशातील प्रतिष्ठित विद्यापीठे किंवा संशोधन संस्थांमधून उच्च पदवी प्राप्त केलेली असेल. अर्जदारांनी चिनी अधिकाऱ्यांनी निश्चित केलेल्या पात्रता आणि आवश्यकता पूर्ण केल्या पाहिजेत आणि कागदपत्रे प्रदान केली पाहिजेत.
के व्हिसाची प्रमुख वैशिष्ट्ये काय?
-चीनच्या विद्यमान १२ सामान्य व्हिसा श्रेणींच्या तुलनेत के व्हिसामुळे अनेक फायदे आणि अधिक सुविधा मिळतील.
-के व्हिसाची प्रवेश वैधता दीर्घ असेल आणि चीनमध्ये राहण्याचा कालावधी वाढवण्याच्यासह आदी सुविधा प्राप्त होतील.
-बहुतेक कामाच्या व्हिसाच्या विपरीत अर्जदारांना घरगुती नियोक्ता किंवा संस्थेला आमंत्रण जारी करण्याची आवश्यकता नाही, ज्यामुळे प्रक्रिया अधिक सोपी असेल.
-चीनमध्ये प्रवेश केल्यानंतर के व्हिसा धारकांना उद्योजक आणि व्यावसायिकांना चीनच्या शिक्षण, संस्कृती आणि तंत्रज्ञानातील शैक्षणिक देवाणघेवाणीत भाग घेण्याची परवानगी दिली जाईल.
अमेरिकेचा ‘एच-१बी’ कोणासाठी?
‘एच-१बी’ व्हिसासाठी जाहीर केलेलं एक लाख डॉलर (सुमारे ८८ लाख रुपये) हे नवीन शुल्क केवळ नवीन अर्जदारांसाठी असून ते एकदाच भरायचं आहे, असं अमेरिकेने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे लाखो भारतीय ‘एच-१बी’ व्हिसाधारकारांना दिलासा मिळाला आहे. सध्या अमेरिकेबाहेर गेलेल्या अशा व्हिसाधारकांना २४ तासांच्या आत परत येण्याच्या सूचना अमेरिकेच्या ‘इमिग्रेशन ॲटर्नी’ आणि नियोक्ता कंपन्यांनी केल्या होत्या. अन्यथा त्यांना अमेरिकेबाहेर अडकून पडावे लागेल आणि अतिरिक्त शुल्क भरल्याशिवाय अमेरिकेत पुन्हा प्रवेश मिळणार नाही, असा इशारा देण्यात आला होता. मात्र, आता त्याबाबतही स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.