देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार उडला आहे. आरोग्य यंत्रणांवर प्रचंड ताण असून अनेक ठिकाणी ऑक्सिजन बेड्स, औषधं यासारख्या गोष्टींचा तुटवडा जाणवत आहे. उत्तर प्रदेशमध्येही करोनाबाधितांची संख्या चिंतेची बाब झाली आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी गोरखपूरचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान योगी आदित्यनाथ यांनी करोना संकटापासून दिलासा मिळावा यासाठी रुद्राभिषेकही केला. योगींनी गोरखनाथ मंदिरामध्ये करोनाची साथ आणि लोककल्याणाच्या संकल्पासाठी एक तास रुद्राभिषेक केला. ज्या पंडितांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांनी रुद्राभिषेक केला त्या पंडितांनी दिलेल्या माहितीनुसार या रुद्राभिषेकामुळे करोनाचं संकट दूर होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की वाचा >> “सर्वांनी सकाळी दहा वाजता यज्ञ केल्यास देशात करोनाची तिसरी लाट येणार नाही”; भाजपाच्या महिला मंत्र्याचा दावा

मुख्यमंत्र्यांनी या रुद्राभिषेकादरम्यान भगवान शंकराच्या वैदिक मंत्रांचे पठण केलं. तसेच ११ लीटर दुध आणि पाच लीटर पाण्याने अभिषेक केला. मुख्यमंत्र्यांनी रुद्राभिषेकाचा सुरुवात गणपतीच्या पुजेने केली. रुद्राभिषेकासाठी मंदिराचे मुख्य पुजारी रमानुज त्रिपाठीसुद्धा उपस्थित होते. त्यांच्या पुढाकारानेच हा रुद्राभिषेक करण्यात आला. रामानुज यांनी मंत्रोच्चार केला तर इतर तीन पुजाऱ्यांनी त्यांना सहकार्य केलं. रामानुज यांनी रुद्र या शब्दाचा अर्थच दु:खांचा नाश करणारे असा होतो, अशी माहिती दिली. करोनाच्या साथीच्या कालामध्ये प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी रुद्राभिषेक फायद्याचा ठरेल असं रामानुज म्हणाले. तसेच करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री प्रत्यक्षात काम करण्यासोबतच आध्यात्मिक मार्गाचाही अवलंब करत असल्याचं रामानुज यांनी सांगितलं. हा रुद्राभिषेकाचा विधी तासभर सुरु होता.

करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर योगी यांनी सोमवारी गोरखपूरचा दौरा केला. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना संसर्ग झालेल्यांचं ट्रेसिंग, टेस्टींग आणि ट्रीटमेंट या मार्गाने काम सुरु आहे. या कामाचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे, अशी माहिती दिली. मागील १० दिवसांमध्ये राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या ८५ हजारांनी कमी झाल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.

देशामध्ये करोनाबाधितांची संख्या झापाट्याने वाढत असून बुधवारी सकाळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत तीन लाख ४८ हजार ४२१ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर याच कालावधीत तीन लाख ५५ हजार ३३८ जणांनी करोनावर मात केली. चिंतेची बाब म्हणजे देशात एका दिवसात झालेल्या मृतांच्या संख्येनं नवा विक्रम नोंदवला आहे. देशात मंगळवारी ४,२०५ रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे देशातील एकूण करोनाबळींची संख्या आता २,५४,१९७ वर पोहोचली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm yogi adityanath recites hour long prayers in gorakhnath temple to end corona scsg